कोषागार दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर

दि.01:- जिल्हा कोषागार कार्यालयात आज कोषागार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कोषागार दिनाचे औचित्य साधून आर्थिक व्यवस्थापन  या विषयावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण संरमळकर  यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी मा.श. वाघमारे, स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अमोल सांडगे, डिजीटल ऑफीसर संदेश सातार्डेकर, कोषागार कार्यालयाचे अपर कोषागार अधिकारी रविंद्र मोरे, अनिकेत गावडे, रविराज शिंदे, लेखाधिकारी श्री. बिराजदार, उमेश मगदूम आदी उपस्थित होते.

दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. संरमळकर यांनी सांगितले की बँक आणि कोषागार कार्यालय एकमेकांशी संलग्न आहेत.  आपल्या आयुष्यातील रोजच्या गरजा भागविण्यासाठी पैसा आवश्यक आहे.  शिक्षण, आरोग्य, निवास या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन फार महत्वाचे असते, असेही ते म्हणाले.  यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेतन खाते, बचत खाते, कर्ज, विमा, नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड  यासारख्या कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या विविध सुविधांची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

लेखाधिकारी श्री. बिराजदार यांनी कोषागार कार्यालयाचे महत्व विषद केले.  सन 1962 पासून  01 फेब्रुवारी रोजी कोषागार दिन साजरा करण्यात येत असून आज याला 60 वर्षे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

स्टेट बँक ऑफ इंडियाने कोषागार कार्यालयासाठी जलशुध्दीकरण संच उपलब्ध करुन दिला.  हा संच आज स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण संरमळकर व शाखा प्रबंधक अमोल सांडगे यांच्या हस्ते कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आला.  कोषागारात येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी व नागरिकांसाठी हा जलशुध्दीकरण संच नक्कीच उपयोगी ठरेल असे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वाघमारे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश मालणकर यांनी तर आभार प्रदर्शन अमृत पाटील  यांनी केले.  कार्यक्रमाला कोषागार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

——–

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.