यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घ्यावा : सुरेशदादा पाटील
इचलकरंजी -प्रतिनिधी
दि: ५ फेबुवारी ज्याप्रमाणे राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी. जेणेकरुन वर्षानुवर्षे पिचत असलेल्या कामगाराला दिलासा मिळून त्याचे आर्थिकमान उंचावले जाईल, अशी मागणी मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी केली आहे.
इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. वस्त्रोद्योग विशेषत: यंत्रमाग हाच या शहराचा मुख्य व्यवसाय आहे. याठिकाणी उदरनिर्वाहाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपर्यातील अनेक कामगार कुटुंबासह येथे स्थायिक झाले आहेत. यंत्रमाग कामगार हा महत्वापूर्ण घटक असला तरी अत्यावश्यक सुविधा आणि शासकीय लाभापासून तो सातत्याने वंचितच राहिला आहे. किमान वेतानाची अंमलबजावणी होत नसल्याने या कामगाराला जीवन जगणे मुश्किलीचे बनल्याने त्याला शासकीय योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. शासनाने ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करुन माध्यान्ह भोजन, सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि आर्थिक अशा विविध योजनांच्या माध्यमातून वेगवेगळे लाभ दिले जात आहे. याद्वारे बांधकाम कामगार सक्षम होण्यास मदत झाली आहे.
याच धर्तीवर असंघटीत क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणे गरजेचे बनले आहे. यंत्रमाग कामगार हा असंघटीत असल्याने त्याला कोणताही लाभ मिळत नाही. या संदर्भात बैठक होऊन यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास शासनाने तत्वतः मान्यताही दिली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीच या प्रश्नी पुढाकार घेऊन यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करुन यंत्रमाग कामगारांची ससेहोलपट थांबविण्यासह त्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी पुढचे पाऊल टाकावे, असेही सुरेशदादा पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.