जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर,:प्रतिनिधी
दि. 27 : जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून करण्यात आला. यावेळी उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सूचना केल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच याठिकाणी उपस्थित बालकांच्या मातांच्या हस्ते फित कापून पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बालकास पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे, अधिष्ठाता डॉ. दीक्षित, प्रभारी जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. विलास देखमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यात पोलिओ मोहिमेंतर्गत 57 सत्रे राबविण्यात आली आहेत. जिल्ह्यात पोलिओचा शेवटचा रुग्ण 23 ऑगस्ट 1999 मध्ये शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावात आढळला होता. सलग तीन वर्षे पोलिओ रुग्ण न आढळल्यामुळे मार्च 2014 मध्ये भारताला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात असणाऱ्या वीटभट्ट्या, कामगार यांची माहिती घेऊन जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसोबत ऊसतोड, वीटभट्टीवर काम करणारे तसेच स्थलांतरित कामगारांची बालके लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. लसीकरण बूथ बरोबरच गृहभेटीद्वारेही बालकांना डोस देण्यात येणार असून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला डोस मिळाल्याची खात्री सर्वांनी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्यासह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) मधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.