श्री दत्त चा ५० वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न: चेअरमन गणपतराव पाटील

शिरोळ/: विजय धंगेकर
दि १ एप्रिल येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२०२२ या ५० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला व दिनांक २५ मार्च २०२२ रोजी सांगता झाली. एकूण १५६ दिवस चाललेल्या या हंगामात १२,८१,९९०.२६१ मे. टन ऊसाचे गाळप होऊन १२.२०% सरासरी साखर उता-याने १५,६५,५०० पोत्यांचे साखर उत्पादन झाले आहे.

कारखान्याने राबविलेल्या विविध ऊस विकास योजना व सभासदांना वेळोवेळी ऊस उत्पादन वाढीसंदर्भात केलेले मार्गदर्शन यामुळे या हंगामात हेक्टरी सरासरी १०१ मे.टन उत्पादन मिळाले आहे. यामध्ये आडसाली ऊस १२९ मे.टन, पूर्वहंगामी ९७ मे.टन, सुरु ७४ मे.टन व खोडवा ७० मे.टन असे हेक्टरी उत्पादन प्राप्त झाले आहे. एकूण साखर उत्पादन व मार्केटमध्ये साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसलेमुळे सर्वच कारखान्यांना आर्थिक तोंडमिळवणी करणे अत्यंत अडचणीचे व जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीतही कारखान्याने हंगाम २०२१-२०२२ सुरुवाती पासून उपलब्ध झालेल्या ऊसाचे एफ.आर.पी. प्रमाणे प्रतिटन रुपये २९२०/- प्रमाणे पेमेंट विनाकपात मुदतीत ज्या त्या वेळी सभासदांना अदा केले आहे. त्याप्रमाणे दिनांक २५ मार्च अखेर हंगामात कारखान्यास पुरवठा झालेल्या १२,८१,९९०.२६१ मे.टन इतक्या सर्व ऊसाचे प्रतिटन रुपये २९२०/- प्रमाणे रुपये ३७४ कोटी ३४ लाख १२ हजाराचे पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूकदारांचे दिनांक २५ मार्चअखेर रुपये ७५ कोटी ३९ लाख ९८ हजार चे पेमेंट संबंधीतांना अदा केले आहे. हंगामपूर्व काळामध्ये कार्यक्षेत्रात आलेल्या भीषण महापूरामध्ये पूरबाधीत झालेल्या सुमारे १५ टक्के ऊस क्षेत्राचे अग्रक्रमाने गाळप करण्यात आले असून सभासद बंधूंचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सदरच्या उसास विनाकपात एफआरपीप्रमाणे पेमेंट अदा केले आहे.
या हंगामात पूरबाधीत क्षेत्रातील वाया गेलेल्या उसास पर्यायी पीक म्हणून ५४ सभासदांच्या १५.३० हेक्टर क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर शुगर बीट पिकाची लागवड केली. सदर क्षेत्रातून एकूण ५५६ मे.टन इतके शुगर बीटचे उत्पादन मिळाले. सदर पिकाला उसाइतकीच एफआरपी दिली आहे. तसेच कामगार, कंत्राटदार तसेच वित्तीय संस्थांची देणी कारखान्याने ज्या त्या वेळी अदा केली आहेत. नदीबूड ऊस क्षेत्रातील सभासदांना जादा उत्पादन घेण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर हंगाम
सालात देशातील चौदा नामांकित शेती शास्त्रज्ञांना बोलवून चर्चासत्र घेतले. सदर चर्चासत्रासाठी असंख्य शेतकरी बंधू उपस्थित होते. यावेळी नदीबूड क्षेत्रासाठी आंबा, पेरु या फळ पिकांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आली आहे. ऊस पिकावर अन्नद्रव्य फवारणीसाठी दिवसेंदिवस मनुष्यबळ मिळत नसल्याने अॅग्रोबोट ड्रोनव्दारे हवाई फवारणीचे
प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर प्रात्यक्षिकास १२०० तज्ञ शेतकरी उपस्थित होते. कारखान्याने सभासदांसाठी ऊस बियाणे, लागवड पासून ऊस तोडणीपर्यंत लागणा-या निविष्ठांचा उधारीने पुरवठा केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे.
या हंगाम सांगता प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील म्हणाले, हंगामपूर्व काळामध्ये कार्यक्षेत्रामध्ये आलेल्या भीषण महापुराच्या संकटामुळे पूरबाधीत क्षेत्रामधील उसामुळे
ऊस गाळपाचे अपेक्षित उद्दीष्ट साध्य होते की, नाही अशी शंका होती. तथापि, कारखान्याचा सन २०२१-२०२२ चा गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी सभासद बंधू भगिनी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी बंधू तसेच कारखान्याचे हितचिंतक या सर्वांची मोलाची साथ लाभली.
हंगामातील सर्वच कामकाज नियोजनबध्द झाले आहे, त्याबध्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच पुढील हंगाम २०२२-२०२३ करीता सर्व सभासद बंधूंनी आपल्या सर्व उसाची आपल्याच कारखान्यास नोंद करावी अशी विनंती केली. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार शंकर देसाई व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व सर्व खाते प्रमुख, कामगार युनियनचे पदाधिकारी, कामगार बंधू व सभासद उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.