खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली माहिती

मुंबईप्रतिनिधी

दि. १९ एप्रिल सोमवारी राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धन यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती,या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबाबत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आणि बैठकीस उपस्थित पुरातत्व विभागाकडील व रस्ते विकास मंडळाकडील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, या बैठकीत खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर सुधार योजनेसाठी  सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,

बैठकीत नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या मंदिरा संदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर माहिती देताना खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर  प्राचीन आणि पुरातन असून मंदिर कृष्णेकाठी असल्याने पुराने वेढले जाते, वेगवेगळ्या कारणांमुळे मंदिराचे होणारे नुकसान रोखणे गरजेचे आहे असे मुद्दे मांडले,यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश बैठकीस उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले,

या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट आय. आय. टी. मुंबई मार्फत करण्यास  मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली, स्ट्रक्चरल ऑडिट करून संरक्षणात्मक उपाययोजना करणे महत्वाचे असल्याचे मत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले, मंदिर जतन व संवर्धन करण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल अशीही ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली,

मंदिर व परिसराचा विकास आराखडा प्रशासकीय मान्यतेस सादर झाला असून येत्या आठवड्यात शासन निर्णय निर्गमित

करण्यात येणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिलीअसेही नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले आहे, या बैठकीस नामदार एकनाथजी शिंदे, नामदार अमित देशमुख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, एमएसआरडीसी चे मोपवलकर, पुलकुंडवार, पुरातत्व संचालनालयाचे तेजस गर्गे आदी उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.