धरणगुत्ती ग्रामपंचायतीनेही केला विधवा प्रथा बंदचा ठराव

शिरोळ : विजय धंगेकर

दि. २५ मे.धरणगुत्ती ग्रामपंचायतीने नेहमीच शासनाच्या आदेशाचे ठराव करुन त्याचे पालन केले आहे. गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने केला असून त्याची अंमलबजावणी निश्चितपणाने केली जाईल. समितीच्या माध्यमातून प्रबोधन करुन ही प्रथा बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेईल, असे प्रतिपादन माजी सरपंच व दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीनेही ९ मे रोजी विधवा प्रथा बंदचा ठराव केला होता. ठरावाच्या इतिवृत्ताच्या सर्व बाबी पूर्ण करुन मंगळवारी त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे यांनी ठरावाचे वाचन केले.
शेखर पाटील म्हणाले, १९९५ सालापासून ग्रामपंचायतीत जो ठराव होईल त्याची अंमलबजावणी केली जाते. धरणगुत्ती ग्रामपंचायतीने नेहमीच विकासात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीत केलेल्या ठरावानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाते. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कारभाराला नेहमीच पाठबळ दिले आहे. विधवा प्रथा बंदचा ठराव केला असून त्याची अंमलबजावणीही करण्यासाठी प्रबोधनातून प्रयत्न केले जातील. या प्रबोधनात सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सरपंच विजया कांबळे, उपसरपंच जीवनसिंग रजपूत, काकासो पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.