जवाहर साखर कारखान्यास ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार ‘

इचलकरंजी : संजय आंबे
दि. ६ जून : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संस्थेकडून गाळप हंगाम सन 2020-21 मधील दक्षिण महाराष्ट्र विभागामध्ये ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार‘ पुणे येथे संपन्न झालेल्या खास समारंभामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक सुकुमार किणींगे, आण्णासाहेब गोटखिंडे, दादासाहेब सांगावे, शितल अमण्णावर, अभय काश्मिरे, गौतम इंगळे आदींनी हा पुरस्कार स्विकारला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई, बेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सन 2020-21 या वर्षातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस पुरवठादारांना बी-बियाणे, ऊस रोपे, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, गांडूळ खत, पाचट अनुदान देण्यात येते. या योजनेमुळे शेतकर्‍यांना अधिकाधिक हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन मिळाले आहे. ारखान्याच्या कार्यक्षेत्रास पूरक व पूर्वहंगामी लागणीसाठी पोषक ऊस जाती ऊस उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात येतात. कारखान्याने क्षारपड व चोपण प्रकारच्या जमीनीमध्ये सछिद्र पाईपचा वापर करून जमीनीतील अतिरिक्त क्षारयुक्त पाणी पाईपलाईनने बाहेर काढण्याची योजना अंमलात आणणार्‍या सभासद शेतकर्‍यांना कारखान्याकडून एकरी 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. ठिबक सिंचनासाठी दोन सरीतील 4॥ फूट अंतराची अट शिथील करून शेतकर्‍यांच्या सोईनुसार सरीतील अंतर ठेऊन स्वयंचलित पध्दतीने ठिबक संच कार्यान्वित करणार्‍या सभासदांना 8 हजारपासून 13 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते.
जवाहर कारखान्यास यापुर्वी नॅशनल फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट अशा नामवंत संस्थांनी तांत्रिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण, वीजबचत, व्यवस्थापन याबाबतचे आतापर्यंत विविध स्तरावर अनेक पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.
कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादांचा प्रत्येक गोष्टीवरील कटाक्ष आणि आर्थिक शिस्त, कुशल मार्गदर्शन व अत्याधुनिकतेविषयीचा आग्रह यामुळेच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार कारखान्यास प्राप्त होत असल्याचे उद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी काढले. कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सभासद संचालक, ऊस पुरवठादार, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.