शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु; शिव विचारांचे पाईक होऊया
-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 6 जून : शिवराज्यभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून शिव विचारांचे आपण पाईक होऊया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील कागलकर हाऊस येथे उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच राज्याभिषेक दिन असून रयतेच्या राजाच्या विचारांचे पाईक होऊन शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत आहे. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी गतवर्षीपासून ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिवविचार सामान्य जतनेपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागामार्फत अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय घेण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला स्वत:च्या हक्काचा निवारा मिळवून देण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षात राज्यात सुमारे ८ लाख घरे बांधली आहेत. हेरवाड गावाने घेतलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय राज्यातील ग्रामपंचायतीने घ्यावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. तसेच मासिक पाळी जनजागृती व स्वच्छतेसाठी दारिद्रयरेषेखालील महिलांना एक रुपयामध्ये सॅनिटरी पॅड देण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.