श्री दत्त साखर शिरोळ’ या नूतन ॲपचा शुभारंभ
तांत्रिक माहिती थेट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्यास होणार मदत
शिरोळ : विजय घंगेकर
दि. ७जून :श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर पोचविण्याचे काम केले जाते. शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच दत्त कारखान्याच्या व्यवस्थापनाने राबविलेल्या विशेष ऊस उत्पादन वाढीबरोबरच अन्य तांत्रिक माहिती थेट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी ‘श्री दत्त साखर शिरोळ’ या नावाने नूतन ॲपचा शुभारंभ आज करण्यात आला.
दरम्यान शेतकऱ्यांच्यापर्यंत सदरची माहिती उपलब्ध होणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

कोल्हापूर येथील इनबीटेक सोल्युशन्स कंपनीच्या वतीने ॲप द्वारे माहिती पुरविली जाणार आहे. या कंपनीचे प्रमुख अमित पाटील यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली.
यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, ऊस उत्पादन वाढीसाठी शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे विशेष लक्ष देत आहेत. सर्वाधिक ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना प्रयत्नशील असून प्रयोगशील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेत आहेत. शेतकऱ्यांना शेतीमधील माती, पाने, पाणी परीक्षण मोफत मिळते. मात्र शेतकऱ्यांना नेमकेपणा त्याचा फायदा व्हावा, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीमधील तंत्र तसेच उत्पादनवाढीचे तंत्र, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने मिळाले पाहिजे यासाठी या ॲपचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेती, पीक, वातावरण, पर्जन्यमान, उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन, पाणी, औषध फवारणी यासह तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे. शेती संदर्भात काही प्रश्न असतील तर शेतकऱ्यांनी ॲपद्वारे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माध्यम म्हणून त्याचा उपयोग करू शकतात. एसएमएस द्वारे माहिती कळू शकते असेही चेअरमन पाटील यांनी सांगितले.
यावेळी व्हॉईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कंपनीच्या वतीने अमरसिंह गायकवाड, दत्त कारखान्याचे आयटी मॅनेजर सतीश पोतदार, यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सर्व खातेप्रमुख व शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.