‘सक्षम’तर्फे दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक

प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य : रविकांत आडसुळ

कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १३ जुलै :’सक्षम’च्या कोल्हापूर शाखेचे कार्य कौतकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढत कोल्हापूर महानगर पालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी सरकारी योजनेसाठी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज असेन अशी ग्वाही  दिली.
येथील ‘सक्षम’ (समदृष्टि, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल) या स्वयंसेवी संस्थेचा स्थापना दिवस आणि हेलन केलर जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर शाखेमार्फत येथील दैवज्ञ बोर्डिंग हॉल, मिरजकर तिकटी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी आणि क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विविध दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी श्रीसंत सूरदास, हेलन केलर आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री.आडसूळ यांच्यासह, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याच्या तसेच महापालिकेचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे, तानाजी नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कौतुक सोहळ्यास प्रारंभ झाला.
दिव्यांग व्यक्तींसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी घरबसल्या,  ऑनलाइनच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या दिव्यांग कॉल सेंटर तसेच व्हॉट्स अप क्रमांकामार्फतही दिव्यांग व्यक्तींना स्वयंपूर्ण होता येते. त्यांच्या मदतीसाठी कोणत्याही पदावर असलो तरी तत्काळ उपलब्ध राहू, असे आश्वासन आडसुळ यांनी दिले.
या समारंभ प्रसंगी सोनल पाटील (वेट लिफ्टींग), विवेक मोरे (टेबल टेनिस), आणि उमेश रांजगणे, उमेश चटके (क्रिकेट) या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवलेल्या दिव्यांग खेळाडूंचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या कौतुक सोहळ्यात अथर्व कोळेकर (अंध), आदित्य शिंदे (बहु विकलांग), रचित नरसिंघानी (स्वमग्न), कल्याणी शिंदे आणि रिद्धी राजाध्यक्ष (सेरेबल पाल्सी), आद्विका लोंढे (अस्थिव्यंग) अशा विविध दिव्यांग प्रकारातील दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.
सक्षमचे कोल्हापूर जिल्हा दृष्टिबाधित प्रकोष्ट प्रमुख अजय वणकुद्रे यांनी या कार्यक्रमात हेलन केलर आणि श्रीसंत सूरदास यांच्याविषयी माहिती सांगितली.
प्रास्ताविक भाषणात सक्षम कोल्हापूरचे सचिव ॲड.अमोघ भागवत यांनी सक्षमच्या स्थापना दिवसानिनित संस्थेच्या  राज्यातील उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थिनी प्रमुख सारिका करडे यांनी उपायुक्त रविकांत आडसुळ यांचे गुलाबाचे रोप देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी हेल्पर्स अँड हँडिकॅप्ड या संस्थेचे गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. या संस्थेचे शिक्षक तानाजी नाईक, सक्षमच्या उपाध्यक्ष डॉ. शुभांगी खारकांडे, गिरीश करडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.