राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचे रुग्णालय करण्याचा मानस
आमदार प्रकाश आवाडे
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि. २७ ऑगस्ट :पूर्वीचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) आणि आताचे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएच) यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय होणार आहे. 300 बेडचे रुग्णालय करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक सौ. सुप्रिया देशमुख यांनी शासनाला पाठविला असून येत्या दोन महिन्यात त्याला मान्यता आणि आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
आयजीजीएच रुग्णालयाचे एनएबीएच आणि एनएबीएल अॅक्रीडेशननुसार आधुनिकीकरणाचे काम सुरु असून अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असे हे रुग्णालय बनणार आहे. या कामाची शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. पी. वाडकर, डॉ. महेश महाडीक आदी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी 300 बेड संदर्भातील शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाची कॉपी आमदार आवाडे यांच्याकडे सुपूर्द केली.
आमदार आवाडे यांनी पाहणी दरम्यान थेट रुग्णांशी संवाद साधला असता रुग्णांनी रुग्णालयाचे नवे रुप व तेथील सुविधा आणि उपचार याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार आवाडे यांनी, राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचे रुग्णालय करण्याचा मानस असून ज्या संकल्पेने हे रुग्णालय करावयाचे होते त्यानुसार काम सुरु असल्याचे नमुद केले. या रुग्णालयात एकूण 6 ऑपरेशन थिएटर असणार असून त्यामध्ये न्यूरो, हार्ट, आर्थो, जनरल असे चार थिएटर पहिल्या मजल्यावर तर तळमजल्यावर अपघात आणि प्रसुतीसाठीचे दोन थिएटर असणार आहेत. नगरपरिषदेच्या ताब्यात असताना हे रुग्णालय 350 बेडचे होते. पण शासनाकडे हस्तांतर करताना कागदोपत्री ते 200 बेडचे नमुद केल्याने त्यानुसार स्टाफ उपलब्ध करुन देण्यात आला. परंतु हे रुग्णालय 300 बेडचे करण्यासंदर्भात मी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आलो आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी त्या संदर्भातील प्रस्ताव पाठविला असून त्याला दोन महिन्यात शासनाकडून मंजूरी आणण्यासाठी आवश्यक तो स्टाफ उपलब्ध करुन देऊ. त्याचबरोबर 75 बेडचे ट्रामा केअर सेंटर मंजूर असून त्याचीही सुरुवात केल्यानंतर हे रुग्णालय 375 बेडचे होणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी 24 बेडचे आधुनिक सुविधा व यंत्रणा असलेला अतिदक्षता विभागांसह सेमी आयसीयु अंतर्गत आणखीन 24 बेडची सुविधा असणार आहे. शिवाय लहान मुलांसाठी 8 बेडचा अतिदक्षता विभागासह 40 बेडचा सेमी अतिदक्षता विभाग असणार आहे.
दरवर्षी रुग्णालयासाठी 11 कोटी रुपयेप्रमाणे पाच वर्षातील 55 कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले असून त्या रकमेऐवजी रुग्णालयास आवश्यक ते साहित्य देण्यात यावे, अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णाला उपचार नाहीत म्हणून माघारी जावे लागणार नाही. तर डॉक्टर्स, परिचारीका व कर्मचारी यांच्यासाठी असलेले आताचे स्टाफ क्वार्टर्स पूर्णत: पाडून त्याठिकाणी नवीन पध्दतीने फ्लॅट बांधण्यात येणार असून त्यासाठीचे साडेचार कोटी रुपये उपलब्ध झालेले असल्याचे आमदार आवाडे म्हणाले.
रुग्णालयाचे रुपडे पालटून अत्याधुनिक सेवा उपलब्ध होताना येथील स्टाफनेसुध्दा रुग्णांशी संवाद आणि समन्वय साधत त्यांना उपचार द्यावेत, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्याप्रमाणे रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसारच कामकाज करावे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गय सहन केली जाणार नाही, असा इशाराही आमदार आवाडे यांनी यावेळी दिला.
यावेळी डॉ. आशिष घाटगे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील, कार्यालयीन अधिक्षक भारत शिंदे, अविनाश चिले, डॉ. संतोष पोळ, सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले शाखा अभियंता सतिश शिंदे, उपअभियंता शिवाजी पाटील, कपिल शेटके, विजय पाटील आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.