वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:प्रतिनिधि

दि:२८:मे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा केला गेला. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केल्याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे. 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी केली होती. आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील आणि त्यातून उद्याच्या समर्थ भारतासाठी गौरवशाली पिढ्यांचे निर्माण होईल, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.