नेत्रदानाबद्दलचे गैरसमज दूर होणे आवश्यक

सांगली : प्रतिनिधी

दि.  : ७ समाजामध्ये नेत्रदानाबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रध्दा दूर करावेत. बुब्बुळाच्या रोगाने पूर्ण अंधत्व आलेल्या व्यक्तीला बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून दृष्टी देता येते, असे प्रतिपादन प्राध्यापक व नेत्रविभाग प्रमुख डॉ. शरद शेगांवकर यांनी  केले.

डॉ. शेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागामार्फत 38 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. शेगांवकर म्हणाले, जगभरात जवळजवळ 4 कोटी 30 लाख अंध व्यक्ती असून त्यातील 1 कोटी 80 लाख अंध व्यक्ती भारतात आहेत. बुब्बुळाचे अंधत्व आलेल्या व्यक्ती 68 लाख आहेत, त्यात दरवर्षी 25 ते 30 हजार रुग्णांची भर पडत आहे. यामध्ये तरुण कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात अंध होत असल्याचे दिसत आहे, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व सांगली या ठिकाणी बुब्बुळे जमा करण्यासाठी आय बँक आहेत. डॉ. संजय पाटील व डॉ. अस्वार यांनी नेत्रदानाची उपयुक्तता उपस्थित वैद्यकीय पदव्युत्तर पदवीपूर्ण विद्यार्थ्यांना व जनसमुदायास माहिती दिली.

मेडीकल अधिक्षक डॉ. राठी, डॉ. बरदाळे, अधिसेविका यांनी नेत्रदान जनजागृतीसाठी लावण्यात आलेले पोस्टर्स, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस दिले. नेत्रपेढीचे समन्वयक अविनाश शिंदे यांनीही सहकार्य केले. डॉ. शैलजा सिन्नम, डॉ. गायत्री खोत व विभागातील सर्व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. सूत्रसंचालन व आभार डॉ. स्वप्नाली बंडगर यांनी मानले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.