नाट्य महोत्सवात नटसम्राट’ने मिळविली रसिकांची दाद

इचलकरंजी:प्रतिनिधी

दि.05.नोव्हेंबर: मराठी नाटकाच्या इतिहासात अनेक नाटकांनी रसिकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केले आहे, त्यापैकीच रंगभूमीच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेले नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमी दिनानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या नाट्यमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पार पडले. साई पूर्वा आर्ट्स गोवा या संस्थेच्या कलाकारांनी हा नाट्यप्रयोग चांगल्या प्रकारे सादर करून उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली.

कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार, मनोरंजन मंडळ व आम्ही रसिक इचलकरंजी, अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

रंगभूमीच्या इतिहासात अनेक दिग्गज कलाकारांनी नटसम्राट हे नाटक सादर केले असून हे शिव धनुष्य साई पूर्वा आर्टच्या कलाकारांनी चांगल्या प्रकारे पेलले. विशेषत: आप्पासाहेब आणि कावेरी या प्रमुख पात्रांच्या भूमिका प्रभावी होत्या. त्याचबरोबर त्यांना सर्व सहकलाकारांची चांगली साथ मिळाली. तांत्रिक बाजूही समाधानकारक होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील नाट्य अभ्यासक प्रा. अशोक दास, मनोरंजन मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश मर्दा, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मिलिंद दांडेकर आणि मध्यवर्ती नाट्य परिषदेचे संचालक राजन मुठाणे यांच्या हस्ते नाटकातील सर्व कलाकारांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या इचलकरंजी शाखेच्या सर्व कलाकारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी स्वागत व सूत्रसंचालन प्रा. कपिल पिसे यांनी केले.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राटचे दिग्दर्शन भालचंद्र उसगांवकर यांनी केले होते.

सहाय्यक दिग्दर्शक अविनाश पुर्खे हे होते. पार्श्वसंगीत- सत्यवान शिलकर यांचे तर

नेपथ्य आणि प्रकाश योजना खेमराज पिळगांवकर यांची होती. रंगभूषा प्रदीप गोवेकर यांनी आणि वेशभूषा मनाली प्रियोळकर यांनी पाहिली. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे व सहकारी यांनी केली. निर्मिती प्रमुख सौ. नविता उसगांवकर या होत्या.

नाटकातील भूमिका व कलाकार- गणपतराव बेलवलकर (अप्पा) – भालचंद्र उसगांवकर, कावेरी – नम्रता गडेकर, सुधाकर- हरिष अडकोणकर, शारदा- आर्या आमोणकर, नंदा- सयोग मडकईकर, नलू – अस्मिता नाईक, विठोबा – महेंद्र बांदोडकर, ठमी- कु. तेजस्वी कुट्टीकर, राजा- यश कुट्टीकर, आसाराम – चिदानंद मडकईकर,

कळवणकर आणि इन्स्पेक्टर – हनुमंत आजगांवकर, याप्रमाणे होते. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या प्रयोगास इचलकरंजी व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.