शास्त्रीय संगीतावर आधारीत ‘सुरीली सुबह’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१० नोव्हेंबर-हिंदी चित्रपट सृष्टीमधील अभिमान वाटावा अशा शास्त्रीय संगीतावर आधारित सुरेल व अविस्मरणीय अशा हिंदी गीतांच्या ‘सुरीली सुबह’ या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली तसेच त्यांची उत्स्फूर्त दाद या कार्यक्रमाने मिळविली. कार्यक्रमाचे निर्माते व दिग्दर्शक संदीप पंचवटकर यांचे अभ्यासपूर्ण तसेच ओघवते निवेदन आणि रेशमी मुखर्जी, राजेश्वरी पवार, आशिष देशमुख व विवेक पांडे या चारही गायकांचे शास्त्रशुद्ध पाया लाभलेले स्वर त्याचबरोबर सर्वच वादक कलाकारांची उत्तम अशी साथसंगत यामुळे हा कार्यक्रम सलग तीन तास उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बाराशे आसन क्षमतेचे संपूर्ण नाट्यगृह खचाखच भरून गेले होते. यावेळी उभे राहूनही अनेक रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमोकळा आस्वाद घेतला.

येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी व रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि नारायणदास दामोदर भंडारी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट २०२३ या उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इचलकरंजी शहर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक ओमप्रकाश दिवटे, निलीमा दिवटे, राजेश काजवे, सविता काजवे, अतुल शहा, लक्ष्मीकांत मर्दा व पद्मा मर्दा आणि पंचवटकर तसेच सर्व संयोजक संस्थांचे अध्यक्ष समीर गोवंडे, श्यामसुंदर मर्दा, नितीनकुमार कस्तुरे, राजेंद्र जैन, शितल उपाध्ये आणि यतिराज भंडारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले.

‘दीपावलीच्या निमित्ताने अशा
प्रकारच्या कलाविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराची सांस्कृतिक गरज पूर्ण होते’ असे सांगून आयुक्त दिवटे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या त्याचबरोबर “नागरिकांनी आवर्जून पर्यावरण पूर्वक दिवाळी साजरी करावी” असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. याप्रसंगी उपक्रम समन्वयक शिवकुमार धड्ड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांना भेटवस्तू प्रदान करून गौरवण्यात आले.

कार्यक्रमात शास्त्रीय संगीतामधील विविध रागांमध्ये तयार केलेली दर्जेदार व श्रवणीय गाणी सादर करण्यात आली. सुरुवातीच्या सत्यम शिवम सुंदरम या गीतापासून शेवटच्या लागा चुनरी मे दाग या गीतापर्यंत सर्वच कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार झाला. यावेळी रेशमी मुखर्जी यांनी सत्यम शिवम, नाम गुम जायेगा, ओ सजना अशी गाणी सादर केली तर राजेश्वरी पवार यांनी सुनो सजना पपीहे ने, पिया बावरी, एक राधा एक मीरा, इत्यादी गाणी सादर केली. विवेक पांडे यांनी मधुबन मे राधिका, नाचे मन मोरा, लागा चुनरी मे दाग ही गाणी सादर केली तर आशिष देशमुख यांनी आओगै जब तुम, झनके झनक तोरी, मेरे नैना, इत्यादी गाणी सादर केली. त्याचबरोबर यावेळी कुहू कुहू बोले, जब दीप जले आना, मेरे ढोलना, काहे तरसाए, हमे तुमसे प्यार कितना अशी द्वंद्वगीते सादर करण्यात आली. कार्यक्रमातील अनेक गीतांवर रसिकांनी ताल धरला त्याचबरोबर वन्स मोअरची दादही अनेकदा दिली.

या मैफिलीसाठी सईद खान- सिंथेसायजर, हार्दिक रावळ- गिटार, सचिन वाघमारे- बासरी, असिफ इनामदार- ऑक्टोपॅड आणि हर्षद गणबोटे व गोविंद कुडाळकर तबला यांनी अतिशय उत्तम अशी साथसंगत केली. यावेळी कुडाळकर यांच्या तबला साथीने टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला. दीपावलीनिमित्त सकाळी संपन्न झालेल्या या मैफिलीत इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते उपस्थित होते. प्रवेशद्वारातील हिरवी केळी, फुलांची रांगोळी, तेवणाऱ्या मातीच्या पणत्या, रंगीत आकाश कंदील, स्वागत कक्षात स्त्रियांसाठी गजरे व सर्वांसाठी पेढे आणि पारंपरिक वेशभूषेतील रसिक वर्ग त्याचबरोबर युवा वर्गामुळे हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. धन त्रयोदशीच्या दिवशी सकाळी शास्त्रीय संगीतावर आधारित अप्रतिम रंगलेली ही स्वरयात्रा सर्वच रसिकांना अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.