डीकेटीईच्या एनएसएस विभागाचा स्तुत्य उपक्रम –
‘आमचे दादा’ कार्यक्रमांतर्गत दिव्यांग सचिन म्हाकवेकर यांना ऑटोमॅटिक व्हीलचेअर प्रदान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २० फेब्रुवारी – डीकेटीई परिवाराच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘आमचे दादा’ या विशेष उपक्रमाची एकवर्षपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम आदरणीय आवाडे दादांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करणारा ठरला.
या कार्यक्रमात स्टार्टअप सेलमधील मेहनती व धैर्यशील दिव्यांग कर्मचारी सचिन म्हाकवेकर यांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी मदतीचा हात देत ऑटोमॅटिक व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. हा हृदयस्पर्शी क्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
डीकेटीईच्या एनएसएस विभागाने दिवाळी दानोत्सवातून संकलित केलेल्या निधीचा उपयोग या विधायक कार्यासाठी करण्यात आला. सचिनच्या संघर्षशील प्रवासाने आणि आत्मविश्वासाने संपूर्ण उपस्थितांना प्रेरित केले. आदरणीय दादांनी सचिनला शुभाशीर्वाद देत त्याच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम शुभेच्छा दिल्या. व्हीलचेअर मिळाल्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवून गेला.
कार्यक्रमाचे नियोजन सोशल डीन प्रा. सचिन कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रस्तावना प्रा. डॉ. ए.ए. रायबागी यांनी केली, तर एनएसएस विद्यार्थी प्रमुख सिद्धांत सावलवाडे यांनी प्रार्थनेद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रतिक्षा पाटील हिने दिवाळी दानोत्सव निधी संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली.
डीकेटीई परिवाराला या कार्याचा अभिमान वाटत असून, हा उपक्रम समाजातील धैर्यवान व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने टाकलेले प्रेरणादायी पाऊल आहे. यावेळी संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी डॉ. ए.बी. सौंदत्तीकर, रवी आवाडे, डायरेक्टर प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रस्टी रवी आवाडे यांनी व्हीलचेअर ही केवळ हालचालीसाठी नाही, तर ती इच्छाशक्तीला बळकटी देणारी आहे, असे सांगितले. मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी सचिनच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सचिन म्हाकवेकर यांनीही डीकेटीई परिवाराने दिलेल्या प्रेम, आपुलकी आणि आशिर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. ‘आमचे दादा’ उपक्रमाची ही वर्षपूर्ती अधिक सुमधुर आणि अर्थपूर्ण ठरली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.