संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५’ महोत्सव उत्साहात संपन्न
कोल्हापूर : संतोष कांबळे
दि.५ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘उमंग २के२५’ मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे समन्वयक प्रा. सुहास पाटील, सौ. समता तेलंग, विविध विभागांचे प्रमुख, सर्व इव्हेंट समन्वयक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विनायक भोसले म्हणाले की, ‘‘विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर विचार करून स्वतःला ओळखणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा महोत्सवांचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित करावीत आणि आपले उद्दिष्ट साध्य करावे.’’ तसेच संचालक डॉ. विराट गिरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.
सहा दिवस विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन
‘उमंग २के२५’ महोत्सव सहा दिवस चालला. या काळात नृत्य, गायन, नाटक, फॅशन शो, पारंपरिक दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मेहंदी, वादविवाद, रांगोळी, नेल-आर्ट, हेअरस्टाईल स्पर्धा, काव्यवाचन, एक्सटेम्पोर आणि ‘कुकिंग विदाऊट फायर’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील ‘निंबस २के२५’ स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. ‘उद्योग सुरक्षा आणि आरोग्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रतिक आवटी आणि प्रा. तृप्ती पुजारी यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. तर सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुख समन्वयक प्रा. सुहास पाटील आणि सौ. समता तेलंग यांनी अतिशय उत्तम व्यवस्थापन करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमंग २के२५’ महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.