डीकेटीईचे विद्यार्थी देशातील टॉप १० मध्ये

मेड इन थ्रीडी’ उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; नवोन्मेषातून साकारले विविध प्रकल्प

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि  २९ : ‘नवोन्मेष हेच भविष्य घडवते’ हा विश्वास कृतीत उतरवत डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘मेड इन थ्रीडी – सीड द फ्युचर एंटरप्रेनर्स’ या प्रतिष्ठेच्या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमात डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी देशातील टॉप १० मध्ये स्थान मिळविले असून, प्रोफेशनल मेंटर्स म्हणून शालेय विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करण्याची संधी त्यांनी मिळविली.‘ला फाउंडेशन द सॉल्ट सिस्टीम’ आणि ‘लेंड अ हॅण्ड इंडिया’ (लाही, पुणे) या स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत देशातील निवडक शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्टार्टअप शैलीतील संघ तयार करून त्यांना सीड फंडिंगच्या माध्यमातून सृजनशील कल्पनांचे प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करण्याची संधी देण्यात आली.

           यावर्षी डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील हर्षवर्धन हरगुडे, पार्थ व्हनवाडे, दीपक यादव आणि पार्श्व पाटील या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांनी देशभरातील सहा शाळांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला (सांगली), शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय (नागालँड), एस. जी. श्रॉफ स्कूल (नंदुरबार), लोयोला उच्च माध्यमिक विद्यालय (जाखमा) आणि अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल (आष्टा) यांचा समावेश होता.

            डीकेटीईच्या विद्यार्थी मेंटर्सच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांनी ‘गार्डस्केल’ (फिश स्केल रिमूव्हर), बांबू व स्टीलवर आधारित वॉकिंग प्लॅटफॉर्म स्टेअरकेस, ‘संस्कृती फोल्डएक्स’ (साडी फोल्डिंग मशीन), मल्टीपर्पज फिल्ड एडर आणि ड्रेंचिंग कंट्रोल यांसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित केले. या प्रकल्पांसाठी सहा शाळांना प्रत्येकी २१ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण १ लाख २९ हजार रुपये उत्पादन विकास निधी देण्यात आला. तसेच तांत्रिक मार्गदर्शन करणाऱ्या डीकेटीईच्या विद्यार्थी मेंटर्सना एकूण १६ हजार ५०० रुपये मानधन देण्यात आले.

           डीकेटीईमध्ये उपलब्ध असलेल्या आयडिया लॅब, इनोव्हेशन सेल, स्टार्टअप कट्टा तसेच विविध आधुनिक प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन व नवकल्पनांसाठी मार्गदर्शन केले जाते. या सुविधांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

         या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील, डॉ. व्ही. आर. नाईक, विभागप्रमुख डॉ. व्ही. ए. कांबळे आणि प्रा. डॉ. सुयोग रायजाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.