सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्हाधिकारी कार्यालयात 101 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान - ⁠101 पिशव्या रक्त संकलित

सांगली: अय्यान पटेल 

दि. २७  : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, अपघातामधील रूग्ण, मोठ्या शस्त्रक्रियावेळी रूग्णांना तातडीने रक्त उपलब्ध होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ सांगली पॅटर्न म्हणून विकसीत करू, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजला येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून इंडियन रेडक्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्र यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसिलदार लीना खरात, तहसिदार (महसूल) जितेंद्र मोरे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्राचे अध्यक्ष डॉ. शिरीष काळे, उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास नाटेकर, विनय भट तसेच पदाधिकारी व स्टाफ, जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नियमितपणे रक्तदान झालं पाहिजे, यासाठी ब्लड बँक रेड क्रॉस सोसायटीनेही वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन रक्तदानासाठी आवाहन करावे. जगामध्ये सगळ्या गोष्टी तयार करता येतात. परंतु मानवी पेशींना किंवा मानवाला स्वतःच्या शरीरासाठी जे निसर्गातून किंवा आईच्या पोटातून मिळालेले आहे, ते निर्माण करणारी एकही वस्तू अद्यापपर्यंत आपण तयार करू शकलो नाही. त्यात रक्त हा असाच एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जर आठवड्याला ठराविक बाटल्या आपल्या रक्तपेढीला देता आल्या तर वर्षभर पेशंटची गरज आहे ती व्यवस्थितपणे पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

            जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये टप्प्याटप्याने अशी शिबिरे आयोजित करण्यात येतील. त्यामुळे रक्ताची गरज भासेल तशी आपल्याला त्या निमित्ताने पूर्ण करता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वेगवेगळ्या मंडळानीही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दर आठवड्याला सातत्याने रक्त उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून त्यांनी सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून १०१ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.