ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन
सातारा साहित्य संमेलनात खाशाबांच्या पुस्तक प्रकाशनाला प्रथम मान
सातारा :प्रतिनिधी
दि.२:भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. सातारा येथे सुरू असलेल्या संमेलनाच्या प्रकाशन मंचावर पहिले पुस्तक प्रकाशनाचा मान ऑलिम्पिकवीर खाशाबा या पुस्तकाला लाभला आहे.
शाहू स्टेडियममधील साहित्य संमेलनाच्या प्रकाशन मंचावर संमेलन अध्यक्ष, ख्यातनाम साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा क्रीडाधिकारी मा. नितीन तारळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक प्रा. संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.खाशाबांच्या चरित्र पुस्तकाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. रौप्यमहोत्सव व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सवलतीच्या दरात पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. 88 पानी चरित्र पुस्तक खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांनी सजले आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत साताराचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात देशासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्याच्या ही ऐतिहासिक यशोगाथा 2000 मध्ये क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी सर्वप्रथम लोकांसमोर आणली.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टनेही प्रकाशित केले होते. मराठीसह हिंदीमध्येही हे पुस्तक उपलब्ध आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्काराने गौरवित झाले असून इयत्ता 9वी नंतर आता इयत्ता 6 वीच्या पाठ्यपुस्तकातही या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.