पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन

शिरोळ: राम आवळे
दि.७: महापूर, महामार्ग, जंगलतोड, नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयांचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा. पत्रकारितेचा स्तर ढासळत असताना साम्राज्यवाद, जातिवाद, धार्मिकता वाद यामुळे आपण कोठे चाललो आहोत हे डोळसपणे पहावे लागेल. जनतेच्या अनेक प्रश्नांकडे स्वतःचा दृष्टिकोन तयार करून पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा, असे आवाहन ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी केले.


श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर मासिक इंद्रधनुष्यच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पत्रकारिता कशी असायला हवी? या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रधनुष्यचे संपादक, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.शेती प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी, पत्रकार दयानंद लिपारे, डॉ. दगडू माने, सुनील संकपाळ, गणेश पाखरे, महेश पवार आदी पत्रकारांनी पत्रकारितेमधील आपले अनुभव सांगून शुभेच्छा दिल्या.उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी समाजातील विविध प्रश्नांवर पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे विषय मांडले जावेत, असे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.प्रारंभी आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व इंद्रधनुष्यचे संस्थापक संपादक, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रेरणास्थान स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रा. डॉ. मोहन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा योगा खेळाडू आरमान सलिम लकडे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, इचलकरंजी, सांगली परिसरातील पत्रकार उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.