इचलकरंजीत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

दर्जेदार रस्ते, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; सर्वांगीण विकासाचा संकल्प

इचलकरंजी: सलीम मुल्ला 

दि. ८ : इचलकरंजी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त करत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा आज उत्साहात प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटार व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व पर्यावरण या विषयांना प्राधान्य देत इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प यावेळी मांडण्यात आला.


शहरातील अनेक भागांत खराब रस्ते, पाणीपुरवठ्यातील अनियमितता व गटार समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिवशाहू आघाडी सत्तेत आल्यानंतर दर्जेदार रस्त्यांचे जाळे, २४ तास पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा, तसेच भुयारी गटार योजना प्रभावीपणे राबविणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरी सुविधांचा समतोल विकास साधण्यासाठी प्रत्येक प्रभागात समान निधीवाटप, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन व सार्वजनिक स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने शहरातील दवाखाने व रुग्णालये अद्ययावत करणे, गरीब व गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा राबविण्याचा उल्लेख जाहीरनाम्यात आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, ग्रंथालये, क्रीडांगणे व युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, पावसाचे पाणी साठवण, जलसंधारण योजना, तसेच शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी ठोस धोरण आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था व पार्किंग समस्यांवर नियोजनबद्ध उपाय करण्यात येणार आहेत.जाहीरनामा प्रसिद्धीप्रसंगी शिवशाहू आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “जनतेशी केलेला प्रत्येक शब्दाचा करार आम्ही प्रत्यक्ष कृतीत उतरवू,” असा विश्वास व्यक्त करत नागरिकांच्या सहकार्याने इचलकरंजीला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार शिवशाहू आघाडीने व्यक्त केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.