आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय संस्थेचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 

दि. १० नोव्हेंबर २०२६ : आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘स्नेह मेळावा २०२६’ हा सोहळा हॉटेल संस्कृती, आळते ( श्री क्षेत्र रामलिंग मंदिराजवळ ) येथे मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, आणि हितचिंतक उपस्थित होते. अनेक दिवसांनंतर सर्वजण एकत्र आल्यामुळे संपूर्ण वातावरण स्नेहाने आणि आपुलकीने भारून गेले होते.

कार्यक्रमाची सुरुवात गजराजाच्या ( हत्ती ) दर्शनाने झाली आणि संपूर्ण कार्यक्रम सुखद आणि निर्विघ्नपणे पार पडला. यावेळी संगीताची सुरेल मैफिल विशेष रंगली. गेल्या वर्षभरात संस्थेने राबविलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ भेटीगाठी आणि मनोरंजन यापुरताच हा मेळावा मर्यादित नव्हता, तर यावेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. केवळ अभ्यास नव्हे, तर सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शिस्त या गुणांच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचेही दाखले देऊन समजावून सांगण्यात आले.

याचबरोबर यावेळी प्लॅन बी चे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केवळ एकाच पर्यायावर अवलंबून न राहता, दुसरा पर्यायही तयार ठेवावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. एखाद्या परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता, दुसऱ्या संधीचा विचार करावा, कौशल्य विकासाकडे लक्ष द्यावे, व्यवसाय, शेती, नोकरी किंवा इतर क्षेत्रातही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. प्लॅन बी म्हणजे अपयशाची भीती नव्हे, तर आत्मविश्वासाने पुढे जाण्याची तयारी आहे, असा सकारात्मक संदेश यावेळी देण्यात आला. आज अनेकांनी स्पर्धा परीक्षेचा अनुभव गाठीशी घेऊन त्या अनुभवाच्या आधारे कौशल्यपूर्ण व्यवसाय उभारून अनेकांच्या हाताला काम दिलं आहे; ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या ऊर्जेची आणि नव्या आशेची अनुभूती निर्माण झाली.

स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी आपले अनुभव सांगितले, मनमोकळ्या गप्पा झाल्या. संस्थेसाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी स्मरण भेट देण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि स्नेहाची नाळ अधिक घट्ट करण्याचा संकल्प केला.

दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी रंगत वाढवली. गाणी, खेळ, चित्रपट चिठ्ठयातून अभिनयाद्वारे चित्रपट ओळखणे आणि हास्यविनोद यामुळे सर्वांनी तुफान मौजमस्ती केली. अगदी सर्वजण या आनंदात सहभागी झाले होते. जुन्या मित्रांना भेटून, गप्पा मारून, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा ‘स्नेहदीप’ खऱ्या अर्थानं सर्वांना ‘प्रकाशमान’ करणारा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. हा सुंदर सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, नियोजनापासून ते आयोजनापर्यंत हातभार लावला, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशीच आपली स्नेहाची नाळ घट्ट राहो, भेटीगाठी वाढत राहोत आणि आपले ऋणानुबंध असेच अधिक दृढ होत राहोत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. पुन्हा लवकरच अशाच एका सुंदर भेटीच्या निमित्ताने भेटूया, असा विश्वास व्यक्त करत मेळाव्याची सांगता करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.