‘बालविवाह मुक्ती रथा’ ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, तिच्या पूर्ण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ बनवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमेतून अभियानाला गती दिली आहे. या अंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रथाचा शुभारंभ करण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यातील ५० गावांमध्ये हा रथ फिरणार आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायत, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी हा रथ दोन तास थांबेल. याद्वारे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा प्रचार व प्रसार केला जाईल. गावातील नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातील. तसेच ‘आम्ही बालविवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही’ अशी सामूहिक शपथ (प्रतिज्ञा) घेतली जाणार आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, गेल्या ३-४ वर्षांत जिल्ह्यात जिथे कुठे बालविवाहाच्या घटना घडल्या, तिथे प्रशासनाने कायदेशीर कडक कारवाई केली आहे. गावागावात ग्रामसेवक हे ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून, तर अंगणवाडी सेविका ‘सह-प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून सक्रिय आहेत. या यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या कुटुंबात, शेजारी किंवा गावात कुठेही बालविवाह होत असल्यास तात्काळ ‘१०९८’ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही ते म्हणाले.

या प्रसंगी संबंधित विभागातील अधिकारी तसेच संस्थेचे प्रतिनिधी प्रभा यादव, निता आवळे, अमोल कदम, आनंदा कांबळे, प्रतीक्षा बुचडे, आरीफ पानारी, मुस्तफा शिकलगार, माधुरी कांबळे, समीक्षा कोळी, शर्मिला कांबळे, बिस्सिमिला जमादार, शैला कुरणे, आयेशा पटेल, रचना कांबळे, सायली मोरे, सानिका चव्हाण आणि गायत्री कुंभार आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.