रेशीम उद्योगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा: जिल्हाधिकारी अमोल येडगे

महारेशीम अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

कोल्हापूर: प्रतिनिधी

दि.१६:  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधिनस्त जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत महारेशीम अभियान 11 मार्च 2026 अखेर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहायक प्रवीण निकम, वरिष्ठ क्षेत्र सहायक शिवाजी पाटील क्षेत्र सहायक प्रियंका चंदनशिवे तसेच प्रगतशील रेशीम शेतकरी तानाजी पाटील,ज्योतीराम मालवेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रेशीम शेती माहिती पत्रकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. रेशीम रथ जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहुवाडी, हातकणंगले इत्यादी तालुक्यामधून रेशीम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी व सन 2026-27 च्या रेशीम शेती नोंदणी करण्यासाठी फिरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.