खेड रत्नागिरी अंनिसचे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन

खेड,: दीपक  तुळसणकर 
दि. ३१ : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संतापाची लाट उसळली असून रत्नागिरी जिल्ह्यातही अशा भोंदूगिरीच्या घटना घडत  आहेत. वाढत्या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार वाढवावा आणि भोंदू बाबांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली.
याबाबतचे  निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना तहसीलदार खेड यांच्यामार्फत व  पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांना पोलीस निरीक्षक, खेड यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदलाल शिंदे, राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर तसेच अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
       महाराष्ट्रात अलीकडे उघडकीस येणाऱ्या भोंदू बुवा-बाबांच्या प्रकरणांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीशक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी नागरिकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धेला खतपाणी मिळून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचा गंभीर धोका निर्माण होत असल्याचे अंनिसने निवेदनात म्हटले आहे.
        महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अपप्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत पोलीस महासंचालकांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे  कक्ष प्रत्यक्षात कार्यान्वित करून त्यांचे प्रभावी कामकाज सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.
        भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.  जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास करून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका अंनिसने मांडली आहे.
अंनिस रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.