राज्यात प्रथम टप्प्यात 100 ‘महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र होणार सुरू : मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई शहर व उपनगरामध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करणार
मुंबई: प्रतिनिधी
दि.१६: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्यात 100 केंद्र सुरु झाल्यानंतर आगामी काळात राज्यात या कौशल्य विकास केंद्रांची एक हजारपर्यंत संख्या वाढविणार आहे. ही योजना मुंबई महापालिका क्षेत्रात मुंबई शहर व उपनगरांमध्ये राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी यावेळी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे. झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात त्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावा, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासन मिळून काम करेल, असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.