एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत आरोपी जेरबंद; ३४ विविध बँकांची एटीएम कार्डे जप्त
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि.२३ जुलै २०२६ : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून विविध बँकांची ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीवर गुजरातसह महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला २१ जुलै २०२६ रोजी विश्वनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये नवीन एटीएम कार्ड सक्रिय करण्यासाठी गेल्या असता, तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी इसमाने मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले. ओटीपीद्वारे कार्ड सक्रिय करून हातचलाखीने फिर्यादीचे कार्ड स्वतःजवळ ठेवले आणि त्याऐवजी दुसरे एटीएम कार्ड देऊन “सर्व्हर डाऊन आहे” असे सांगून त्यांची दिशाभूल केली. काही वेळातच फिर्यादींच्या खात्यातून पैसे काढल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. मांडवी परिसरात संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. मुरत सिटी, जिल्हा सुरत, गुजरात) असे आहे. त्याच्याकडून फिर्यादीचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात तो राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकून विविध बँकांची एकूण ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध गुजरातमधील देवघड बारिया, अहमदाबाद, पालनपूर, राजकोट, सुरत, खेडा तसेच कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्वासघात, चोरी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. व्ही. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर व पोलीस उपअधीक्षक अभिजीत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी पार पाडली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.