वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे लक्ष द्या; ‘टफ’ योजना सर्व यंत्रमाग घटकांना लागू करा –
अशोकराव स्वामी यांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
दि.२ : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासमोरील गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी ‘टफ (TUFS)’ योजनेचा लाभ केवळ शटललेस यंत्रमागापुरता मर्यादित न ठेवता, साध्या पॉवरलूमसह वस्त्रोद्योग साखळीतील सर्व घटकांना लागू करावा, तसेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत सूतगिरण्यांना अनुदानित दरात कापूस उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
महासंघाने राजस्थानातील पाली, जोधपूर व बालोतरा येथील पर्यावरणीय कारणांमुळे बंद असलेल्या प्रोसेसिंग उद्योगांचा महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगावर गंभीर परिणाम होत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची ४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.महासंघाने सांगितले की, इचलकरंजी, भिवंडी, विटा, मालेगाव यांसारख्या प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांतून राजस्थानला प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आलेले पॉपलीन, केंब्रिक व इतर ग्रे कापड अनेक महिन्यांपासून गोदामांमध्ये पडून आहे. प्रोसेसिंग उद्योग बंद असल्याने हे कापड खराब होत असून उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
राजस्थानमधील प्रोसेस उद्योग ठप्प झाल्याने महाराष्ट्रातील अनेक पॉवरलूम कारखाने अंशतः किंवा पूर्णपणे बंद पडले आहेत. पर्यायी राज्यांमध्ये कापड प्रक्रिया करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात जास्त असल्याने उत्पादन खर्च वाढून उद्योगाची स्पर्धात्मकता कमी होत असल्याचे महासंघाने स्पष्ट केले. या परिस्थितीचा परिणाम सूतगिरण्यांवरही होत असून, यंत्रमाग उद्योगातील उत्पादन घटल्याने सूताची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अनेक सूतगिरण्या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सीसीआयमार्फत अनुदानित दरात कापूस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे महासंघाने नमूद केले.
महासंघाच्या सर्व मागण्या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, संचालक व माजी नगरसेवक दिलीप मुथा, महेश सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन उल्हास सूर्यवंशी यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.महासंघाने केंद्र शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळेल, लाखो कामगारांचा रोजगार सुरक्षित राहील आणि उद्योग पुन्हा गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.