विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती व रोड सेफ्टीबाबत मार्गदर्शन

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.२४: दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध आव्हानांची माहिती मिळावी तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे तसेच सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना तसेच वैयक्तिक माहिती, फोटो व संवेदनशील माहिती शेअर करताना विद्यार्थ्यांनी विशेष दक्षता बाळगावी, असे त्यांनी सांगितले.

       इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगारी आणि रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. व्यसनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले. बाल गुन्हेगारीपासून दूर राहण्यासाठी चांगल्या संगतीची निवड करावी, कायद्याचे पालन करावे आणि चुकीच्या कृतींना प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

      वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. स्वतःबरोबरच रस्त्यावरील इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेणे गरजेचे असून, ‘रोड सेफ्टी ही केवळ पोलिसांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.        कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरली.

       या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगारी आणि वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शनाला सकारात्मक प्रतिसाद देत सुरक्षित व जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी कॉलेजचे प्राचार्य शंकर खाडे, निर्भया पथकाचे असिफ सिराजभाई, शहर वाहतूक शाखेचे राकेश मछले, पोलीसमित्र गजानन शिरगांवे, लेफ्ट. विनायक भोई, कुंभार सर तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.