शहाजी महाविद्यालयात ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ निर्मिती व प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी घेतले रसायनशास्त्रातून उद्योजकतेचे धडे

कोल्हापूर: प्रवीण भोसले

दि २९ : श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘केमस्पेक्टरम स्टडी कॉर्नर’चे उद्घाटन तसेच ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ निर्मिती व प्रदर्शन उत्साहात पार पडले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्रातील ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करत उत्पादननिर्मिती आणि उद्योजकतेचे धडे घेतले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते ‘केमस्पेक्टरम स्टडी कॉर्नर’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले आणि विज्ञान विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. मगदूम-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

         रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. मनोज सं. कांबळे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी उत्पादननिर्मितीसाठी घेतलेले परिश्रम, वेळेचे नियोजन, जिद्द, सातत्य आणि सर्जनशीलतेचे त्यांनी कौतुक केले.प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी हँड सॅनिटायझर, हर्बल साबण, हर्बल फेसवॉश, धूप, परफ्युम यांसह विविध ऑर्गॅनिक व हर्बल उत्पादने तयार करून त्यांचे प्रदर्शन मांडले. या उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कच्च्या मालाची निवड, योग्य प्रमाण, गुणवत्ता, सुरक्षितता, पॅकेजिंग तसेच आकर्षक सादरीकरण या बाबींचा शास्त्रीय पद्धतीने विचार करण्यात आला.

         या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील सैद्धांतिक ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी प्रत्यक्ष संबंध जोडण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर उत्पादननिर्मिती, कौशल्यविकास, गुणवत्ता नियंत्रण, सादरीकरण आणि उद्योजकता यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. रसायनशास्त्राच्या माध्यमातून दैनंदिन वापरातील उत्पादनांसाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करता येतात, हा संदेशही या प्रदर्शनातून देण्यात आला.कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागातील सुमारे ९० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.