राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

कोल्हापूर:प्रविण भोसले 

दि. ३१ : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, महाज्योती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भटके-विमुक्त दिवस राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पाचगाव, तालुका करवीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भटके-विमुक्त समाजाचा गौरवशाली इतिहास, सामाजिक योगदान, शैक्षणिक प्रगती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील वि‌द्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उ‌द्देश होता.कार्यक्रमाची सुरुवात दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, इस्पुर्ली येथील वि‌द्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक गज नृत्याने झाली. वि‌द्यार्थ्यांच्या आकर्षक आणि उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीरचे पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्यावे आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच भटके-विमुक्त समाजातील वि‌द्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. अण्णासाहेब कोल्हटकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून भटके-विमुक्त समाजाचा इतिहास, या समाजाचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. भट‌के-विमुक्त दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शशांक देशपांडे, अशोक ‘लाखे, स्वप्निल निपाणीकर, जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य तसेच बाळासाहेब राऊत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागासः बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक संचालक सुनीता नेर्लीकर यांनी केले. त्यांनी भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमांदरम्यान विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, उपलब्ध होण्यास मदत झाली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या परदेशी शिष्यवृतीसाठी पात्र ठरलेल्या वि‌द्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.