इचलकरंजी येथे श्रीमंत गंगा माईसाहेब यांची पुण्यतिथी समारंभ उत्साहात साजरा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि 25 श्रीगंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे श्रीमंत गंगा माईसाहेब यांची पुण्यतिथी समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. बा. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री श्रीनिवासजी बोहरा होते. प्रमुख व्याख्यात्या म्हणून सुप्रसिद्ध कवियत्री सौ. मनिषा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कवियत्री सौ. मनिषा पाटील म्हणाल्या, गंगामाईंनी राणीसाहेब म्हणून स्वतःचा संसार केला नाही. त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे करून रयतेचा संसार केला. गंगामाईना काहीकाळ गरिबीचे दिवस ही अनुभवावे लागले. परंतु या दिवसातही त्या आपली ध्येय व कर्तव्य विसरल्या नाहीत. त्यांनी आईच्या ममतेने सामाजिक व शैक्षणिक कार्य केले. इचलकरंजीमध्ये अनेक संस्था त्यांच्या पुढाकाराने उभारल्या गेल्या आहेत. विद्यार्थिनीनी त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे. मन, मेंदू, मनगट यांचा समन्वय साधला तर प्रगती शक्य आहे. आपल्या आईवडिलांनी जन्माला घातल्याचा त्यांना पश्चाताप होऊ नये असे कार्य करावे. वाचनाने माणूस विचारी बनतो विचारी माणूस अविचाराने वागत नाही. शिक्षणाने आतला माणूस जागा झाला पाहिजे केवळ शिक्षण हीच संपत्ती आपल्या मालकीची आहे असे प्रतिपादन केले.
स्वागत व प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर म्हणाल्या इचलकरंजीच्या कर्तुत्ववान राणीसाहेब म्हणून गंगामाईनी परिसरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी आपल्या स्त्रीधनातून अनेक समाज उपयोगी कामे केली. इचलकरंजीत महिलांना उभारले. पंचगंगा नदीवरती महिलांच्यासाठी घाट बांधला. आपले पती नारायणराव बाबासाहेब यांच्या बरोबरीने सामाजिक कार्य केले. माईसाहेबच्या आशीर्वादाने व प्रेरणेने प्रशालेचे कार्य सुरू आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी एक उपक्रमशील प्रशाला म्हणून कार्य सुरू केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा म्हणाले, मुलींनी माईसाहेबांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवावा व प्रशालेचे नावलौकिक वाढवावा.
यावेळी कु. ऋतुजा अवडले या विद्यार्थिनीचा खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल व कु. अलहिदा शेख या विद्यार्थिनीचा जिल्हा कबड्डी स्पर्धेत किशोर गटात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
श्रीमंत गंगामाई पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासजी बोहरा, स्कूल कमिटीचे चेअरमन मारुतराव निमणकर, संस्थेचे विश्वस्त महेश बादवलकर,अहमद मुजावर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर, उपप्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, पर्यवेक्षक श्री. व्ही. एन. कांबळे, विभाग प्रमुख प्रा. सौ. आर. पी. इंगळे , प्रा. शेखर शहा, ओमजी पारिख, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी बोहरा होते. स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले. अहवाल वाचन विभाग प्रमुख सौ. आर. पी. इंगळे यांनी केले. स्वागत गीत सौ. ए. ए. रानडे व विद्यार्थिनी यांनी गायले. सूत्रसंचालन सौ. एस.पी. धांतुदे यांनी केले. आभार पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.