कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समितिचा मेळावा संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ११ मार्य्च बँकांबरोबरच खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीच्या नांवाखाली बेकायदेशीररित्या कर्जदारांचे आर्थिक शोषण सुरू आहे. ते वेळीच रोखण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने संघटीतरित्या लढा सुरू असून त्यामध्ये सर्वांनी संघटीतपणे सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे मार्गदर्शक व लोक जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश कायदा विभागाचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब घोरपडे यांनी केले.
इचलकरंजी येथील महेश क्लबमध्ये आयोजित कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर मुंबई प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्त्या अॅड. नियती ओभान, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर, कृती समिती सल्लागार अॅड. अभिजीत मेरुडे, अॅड. रोहन ओभान, अॅड. राहुल वारंग, समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष योगेश वाघमारे, शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना महाराष्ट्र राज्याध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करत मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी अॅड. आप्पासाहेब घोरपडे म्हणाले, बँकींग क्षेत्र हा व्यवसाय नसून सेवा आहे. पण, काहींनी तो सावकारीचा व्यवसाय म्हणून अवलंबला असल्यामुळे कर्ज वसुलीच्या नांवाखाली कायद्याची भिती दाखवून मालमत्ता जप्ती भिती दाखवली जात आहे. वास्तविक, कर्जदारांनी बँका व खासगी फायनान्स कंपन्यांना मालमत्ता संदर्भात लेखी दिले असले तरी कारवाईच्या नावाखाली श़ोषण करु शकत नाहीत, असे सांगितले.
यावेळी नियती ओभान, प्रसाद करंदीकर, अभिजीत मेरुडे, रोहन ओभान यांच्यासह मान्यवरांनी उदाहरणांव्दारे कर्ज वसुलीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या कर्जदारांची होत असलेली आर्थिक पिळवणूक स्पष्ट केली. कर्जदार जामीनदार हक्क बचाव कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी, बँक व खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी अवलंबल्या जात असलेल्या अन्याय, अत्याचार प्रकाराचा पाढाच वाचून दाखवला. यावेळी कर्जदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे दिली.
सूत्रसंचालन अनिल लोकरे यांनी तर आभारप्रदर्शन नंदकुमार लोखंडे यांनी केले. या मेळाव्यास कर्जदार, जामीनदार व नागरिक उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी राजेश वाघमारे, सोमनाथ वाघमारे, दगडू जगताप, वैभव पवार, गजानन शिंदे, सागर माने, सुरज गंथडे, अमोल खडसे, वजीर शेख, नितीन एडके, नंदकिशोर एडके, विशाल ढवळे, राजू दफेदार, अर्जुन पाटील, ओमकार आवटे, सागर मरवडे, किशोर साळी, आदित्य वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.