राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मौखिक तपासणी व बक्षिस वितरण समारंभ संपन्न

रत्नागिरी;प्रतिनिधी

दि.30:- आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचे सहकार्याने जिल्हयातील काही निवडक शाळांतील विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा स्तरावरील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील संशयित मौखिक कर्करोग रुग्ण तपासणी मोहीम याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले- गावडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. अनिरुद्ध आठल्ये, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ प्रणव साठे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ. शैलेश गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळांमध्ये जनजागृती केल्याबद्दल सचिन भरणे व समुपदेशनाबद्दल श्रीमती प्राची आशिष भोसले व श्री तुषांत भिंगार्डे, नोवार्टिस आरोग्य परिवार आणि उपजिल्हा रुग्णालय कळंबणी यांना उत्तम कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

तंबाखू सेवन हे जगामध्ये होणाऱ्या विविध आजाराचे व मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतात प्रत्येकवर्षी जवळपास ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजारांमुळे होतो. विविध प्रकारचे हृदयरोग, फुप्फसाचे आजार, कर्करोग हे देखील तंबाखू सेवनाशी निगडीत आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.  उपस्थित विदयार्थी, पालक, शिक्षक तसेच रुग्ण यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी  मनोगतात व्यक्त केला.

काही निवडक जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांतील विदयार्थ्यांचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दर्शविणारे चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या विदयार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  डॉ. प्रणव साठे यांनी आलेल्या रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करून व्यसन सोडणेकरिता औषधे देऊन रुग्णांचे समुपदेशन केले. सदर शिबिराचे दरम्यान 16 संशयित मौखिक रुग्णांची तपासणी करण्यांत आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.