सायकल चालवा, निरोगी अन् आनंदी राहा’

सायकल रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, शेकडो सायकलपटूंनी केले सायकलींग

कोल्‍हापूर : प्रतिनिधी

दि.०३. नियमित सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविण्याने मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. विविध आजार दूर पळतात. तेव्हा शरीर तंदुरुस्त आणि आपल्या जीवनातील आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी नियमितपणे सायकल चालवणे हाच चांगला पर्याय आहे. सायकल चालवा आणि जीवनात निरोगी-आनंदी राहा’अशा शब्दांत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी तंदुरुस्त जीवनासाठी टिप्स दिल्या. निमित्त होते, ‘तीन जून, जागतिक सायकल दिनाचे !’.कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) प्रायोजित व कोल्‍हापूर सायकल क्‍लब यांच्यावतीने शुक्रवारी ३ जून कोल्हापुरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक अजित नरके, कोल्‍हापूरच्‍या पहिल्‍या महिला आयर्न मॅन माहेश्वरी सरनोबत व कोल्हापूर साईकल क्लबचे अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा चौक येथे रॅलीचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, ‘आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. तुम्हाला तंदुरुस्त व निरोगी राहायचे असेल तर  शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे फार महत्त्वाचे आहे. ज्या काळापासून वाहनाचा वापर सुरू झाला आणि लोकांच्या दैनंदिन कामात वेळेची कमतरता भासू लागली तेव्‍हा पासून लोकांनी सायकल चालवणे कमी केले. मात्र तंदुरुस्त व निरोगी जीवनासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे. सायकलींगचे अनेक फायदे आहेत. पार्किंगची, वाहतुकीची समस्या उदभवत नाही. शरीर तंदुरुस्त राहते. आनंदी वृत्ती वाढते. त्यामुळे शैक्षणिक संस्था,शासकीय कार्यालय, सहकारी कार्यालय व इतर कार्यालयामध्ये सायकल वापराबाबत जागरूकता व्हावी या दृष्टीने वेळोवेळी उपक्रम राबवावेत. कोल्हापूर सायकल क्लबने राबविलेल्या रॅली उपक्रमास गोकुळ दूध संघाचे नेहमीच सहकार्य असेल. ’

सायकल रॅलीला  नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.अतिशय उत्साही वातावरणात दसरा चौक येथून रॅलीस सुरुवात झाली. दसरा चौक, हॉकी स्‍टेडियम, शेंडापार्क, शांतीनिकेतन,कावळा नाका ते गोकुळ संघाच्‍या ताराबार्इ पार्क कार्यालय या मार्गाने सायलक रॅली निघाली. या सायकल रॅलीत जवळपास २०० सायकलपटूनी सहभाग घेतला. दरम्यान  सायकल रॅलीमध्ये कोल्हापूर सायकल क्लब,सनराईज सायकल क्लब, कोल्हापूर बाइसिकल क्लब, ट्रेक अॅन्ड ट्रेल्स ग्रुपसह तसेच गोकुळ संघाचे अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले.

ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथे  सर्व सायकलपटूंचे स्वागत करण्यात आले. सर्व स्‍पर्धकांना संघामार्फत चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व मान्‍यवरांच्‍या उपस्थिती प्रमाणपत्र देण्‍यात आलीत व संचालक अजित नरके,कोल्‍हापूर च्‍या पहिल्‍या आयर्न मॅन महिला माहेश्वरी सरनोबत, कोल्‍हापूर सायकल क्‍लबचे संदीप मगदूम यांनी मार्गदर्शन केले तसेच एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी चेअरमन विश्‍वास पाटील, संचालक अजित नरके,कोल्‍हापूर च्‍या पहिल्‍या आयर्न मॅन महिला माहेश्वरीसरनोबत, अनिल शिंदे, संदीप मगदूम,सूरज मोहिते, सुजय जाधव, राजेश बाभुळकर, सुभाष माने, रुपेश चौगले,अतुल शिंदे, अर्जुन पाटील, रोहन पवार,ओंकार खाडे, विष्णु खडके, राजेश बुवा,अभय पेडणेकर,बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थाप हणमंत पाटील, आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील व व कोल्हापूरातील विविध सायकल क्लबचे  सायकलपटू आदि उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.