संजय घोडावत विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना भेटी

हातकणंगले :अब्दुल नदाफ

दि. ७ ऑगस्ट :संजय घोडावत विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गती मिळावी या उद्देशाने विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील आणि रिसर्च डीन डॉ.आनंद सावंत यांनी ऑस्ट्रेलियातील नामवंत विद्यापीठांना भेटी दिल्या. ऑस्ट्रेलियन आणि भारतीय शिक्षणाचा संबंध दृढ करण्याच्या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियातील नामांकित आठ विद्यापीठांना भेट दिली यामध्ये मेलबर्न, मोनॅश युनिव्हर्सिटी, क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, डीकिन युनिव्हर्सिटी, स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ सनशाइन कोस्ट, सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी आणि व्हिक्टोरियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठांचा समावेश आहे.

शिष्टमंडळाने मेलबर्न विद्यापीठाला भेट दिली आणि तेथील प्रख्यात संशोधक प्रोफेसर राजकुमार बुय्या, क्लाउडचे संचालक (क्लाउड,संगणन आणि वितरण प्रणाली) आणि सीईओ, मांजरासॉफ्ट, मेलबर्न  विद्यापीठ यांच्या लॅब सोबत अधिकृत सामंजस्य करार केला. या माध्यमातून  कॉम्प्युटिंग आणि आयओटी क्षेत्रात क्षमता व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भविष्यात एसजीयु हे क्लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानातील एक प्रादेशिक केंद्र असेल अशी आशा देखील प्रोफेसर राजकुमार बुय्या यांनी व्यक्त केली.

स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत एसजीयुच्या विद्यार्थ्यांना येथे शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत  प्रा पास्केल जेनेव्हिव्ह क्वेस्टर (कुलगुरू) आणि प्रोफेसर अॅलेक्स स्टोजेव्हस्की( डीन स्कूल ऑफ सायन्स, संगणन आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान) यांनी सहमती दर्शविली. शिष्टमंडळाने पुढे स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग आणि  डिझाईन सेंटर आणि संशोधन विभागाला भेट दिली. तेथे त्यांनी सेंटर फॉर सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल कन्स्ट्रक्शन विभागाच्या डॉ अंबरीश कुलकर्णी (वरिष्ठ व्याख्याते) यांच्याशी विविध विषयावर सकारात्मक चर्चा केली.

प्रोफेसर अरुण पाटील यांनी शिक्षण घेतलेल्या मोनॅश युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि करार व्यवस्थापक ऍनेट पिचर यांनी बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी परदेशात अभ्यास करण्यास सहमती दिली आहे. मोनॅश विद्यापीठाचा बी.फार्मसी अभ्यासक्रम जगात प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर मोनाश विद्यापीठाच्या संसाधन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचचे असोसिएट प्रोफेसर मोहन येलिशेट्टी यांच्याशी विविध  संशोधन कार्यावर करार झाला.
डीकिन युनिव्हर्सिटीचे प्रख्यात आभासी वास्तव तज्ज्ञ प्रोफेसर बेन होरान यांनी एसजीयु मध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटी प्रयोगशाळा स्थापन करण्याचे मान्य केले. यानंतर मेलबर्न शहरात शिष्टमंडळाने व्हिक्टोरियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सीईओ श्री. नागार्जुन सुरपाणेनी, शैक्षणिक परिषद सदस्य आणि माजी फेडरल मिनिस्टर अॅलन ग्रिफिन, कार्यकारी डीन प्रोफेसर सिड नायर आणि प्रोव्होस्ट डॉ अँड्र्यू,  यांच्यासोबत एमबीए आणि आयटी अभ्यासक्रमासाठी परदेशातील शिक्षणासाठी सकारात्मक चर्चा झाली.

क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (क्यूयूटी), ब्रिस्बेन येथे शिष्टमंडळाने सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीरिंग स्कूलचे प्रमुख डॉ प्राध्यापक लेस डावेस यांची भेट घेतली. तसेच प्राध्यापक आशिष भास्कर, प्राध्यापक दीपक डुबल  आणि प्रा. मरिना यांच्यासोबत भौतिक विज्ञान, बॅटरी, उत्प्रेरक इत्यादी विषयावर फलदायी चर्चाही झाली.

सेंट्रल क्वीन्सलँड विद्यापीठाच्या भेटीदरम्यान एसजीयु शिष्टमंडळाने सहयोगी कुलगुरू ख्रिस वेरा, सहयोगी डीन इंटरनॅशनल एंगेजमेंट  डॉ राजेश सरीन, डॉ प्रसाद गुडिमेटला आणि डॉ राज मुरलीथेरन कनाग्राजू यांच्याशी भेट घेतली. आयटी आणि अभियांत्रिकी तसेच विज्ञान, हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान आणि प्लास्टिकचे पुनर्वापर इत्यादी क्षेत्रातील संशोधनाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ सनशाइन कोस्टचे प्रोफेसर ली-मिन आंग (केन) यांच्याशी भेट करताना इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्समधील प्रोग्राम्स, अभियांत्रिकी, संशोधन अनुदान लेखनासाठी संशोधन सहयोग, पीएचडी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी संयुक्त पर्यवेक्षण इत्यादीबाबत फलदायी चर्चा झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.