गणेशोत्सवातील खर्चाला फाटा देत आण्णा कावतील ग्रुपतर्फे कन्यारत्न ठेव पावती प्रदान

स्व.इंदुमती आवाडे यांचे नांवे सेवाभावी वृध्दाश्रम सुरु करणार : आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी : विजय मकोटे
दि .६ सप्टेबर : गावभागातील रौप्य महोत्सवी आण्णा कावतील मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपसत सहा मुलींच्या नांवे ठेव पावतीचे वितरण आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष ठेव म्हणून दिव्यांग कु. अदिती लंगोटे हिला सन्मती मतिमंद शाळेमध्ये प्रवेशासह तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आमदार आवाडे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर निराधार वृध्दांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळणारे  स्व. सौ. इंदुमती आवाडे यांच्या नांवे सेवाभावी वृध्दाश्रम लवकरच सुरु करण्याचा संकल्प आमदार आवाडे यांनी मांडला.
आण्णा कावतील मंडळाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 15 व 16 मार्च रोजी इचलकरंजीत जन्मलेल्या मुलींच्या नांवे स्व.सौ. इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे कन्यारत्न ठेव पावतीचा संकल्प केला होता. त्यानुसार 6 मुलींना प्रत्येकी 2500 रुपये ठेव पावतीचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी, मंडळाने अनावश्यक खर्चाला फाटा देत अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे. ही ठेव म्हणजे मुलींच्या भविष्यासाठी मंडळाने जबाबदारी घेतली आहे. इचलकंरजीत स्व. सौ. इंदुमती आवाडे यांच्या नांवे निराधारांसाठी सेवाभावी वृध्दाश्रम सुरु करण्याचा संकल्प मांडत त्याठिकाणी निराधार वृध्दांच्या राहण्याची, मनोरंजनांची व आरोग्यासाठीच्या सर्व सुविधा देण्यात येईल असे जाहीर केले. या संकल्पनेनंतर माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागाते यांनी 51 हजार तर राजू बचाटे यांनी 25 हजार देण्याची घोषणा केली. तर माई पाटील यांनी या वृध्दाश्रमात विनामुल्य सेवा करण्याचा संकल्प केला.
प्रास्ताविकात किरण लंगोटे यांनी, सदर कन्यारत्न ठेव ही मुलीच्या जन्मावेळेस ठेवली असल्याने ज्यावेळी मुलीचे वय 25 वर्षे होईल त्यावेळी तिला 25 हजार रुपये मिळतील आणि शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्न कार्यसाठी उपयोगी ठरतील असे सांगितले. कार्यक्रमास दत्तात्रय जोशी, बाळासाहेब चौगुले, नंदू पाटील, शिवाजी काळे, सी. ए. चौगुले, मोहन चौगुले, संजय जगताप, शितल चौगुले, किशोर निंबाळकर, प्रसाद कुलकर्णी, रवि दत्तवाडे, अजय जाधव, अक्षय मगदूम, अमोल जगताप, शुभम चौगुले यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.