GST कपात निर्णयाचे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे स्वागत

इचलकरंजीविजय मकोटे

दि .८ : भारत सरकारने GST च्या चार वर्गवारी ऐवजी आता केवळ दोनच – ५ टक्के आणि १८ टक्के – अशी वर्गवारी ठेवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले आहे.यामुळे वस्त्रोद्योगातील महत्त्वाचे दर कमी झाले आहेत. आतापर्यंत मानवनिर्मित धागा व फॅन्सी सूत यावर १२ टक्के जीएसटी लागू होता, तो आता ५ टक्क्यांवर आला आहे. तसेच तयार कपड्यांवरील १८ टक्के जीएसटीही ५ टक्क्यांवर कमी झाला आहे. परिणामी उत्पादन खर्च घटून तयार कपडे, पॉलिस्टर व फॅन्सी कापड स्वस्त होणार असून ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे. निर्यातदारांचाही उत्पादन खर्च कमी झाल्याने भारतीय वस्त्रउद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळेल, अशी अपेक्षा आहे.याशिवाय जीएसटी परतावा काही आठवड्यांत मिळणार असल्याने उद्योजकांना खेळते भांडवल सहज उपलब्ध होईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लावल्याने तेथील निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. या संदर्भात वाणिज्य मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे उपाययोजनांसाठी निवेदन देण्यात आले असून त्यात खालील मागण्या केल्या आहेत :

बांगलादेश, व्हिएतनाम, नेपाळ आदी देशांतून येणाऱ्या वस्त्रउत्पादनांवर आयात शुल्क वाढविणे.

देशांतर्गत बाजारपेठेत लघु व मध्यम उत्पादकांना प्रोत्साहन देणे.

बँकेच्या व्याजदरात कपात करून उत्पादकांना दिलासा देणे.

नवीन देशांमध्ये निर्यात वाढविण्यासाठी दुतावासामार्फत मार्केटिंग, सॅम्पल डिस्प्ले सेंटर आणि गोदामांची सुविधा उपलब्ध करून देणे.

अमेरिकेसाठी आधीच तयार झालेल्या मालावर जुन्याच दराने आयात परवानगी मिळवण्यासाठी भारत सरकारने दबाव आणणे.

असोसिएशनने आत्मनिर्भर भारत व ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत भारतीय वस्त्रउद्योगाला प्रोत्साहन द्यावे, तसेच देशांतर्गत ग्राहकांना भारतीय उत्पादने खरेदीसाठी प्रोत्साहित करण्याच्या जाहिराती सरकारने कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.