कृषीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी करावा
अनिल बागणे : शरद कृषि महाविद्यालय प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ
जैनापूर:राम आवळे
दि .९: कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक माहिती आत्मसात करावी, तसेच त्याचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि अभिनव मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी करावा, असे प्रतिपादन संस्थेचे एक्झिक्युव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालयात प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते.श्री. बागणे पुढे म्हणाले, “शरद पॅटर्न हे विद्यार्थी-केंद्रित पॅटर्न असून त्यात केवळ अभ्यासावर नव्हे, तर संस्कार, कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांवरही भर दिला जातो. शरद पॅटर्नचा विद्यार्थी केवळ गुणी नसून संस्कारी, कर्तव्यदक्ष आणि समाजोपयोगी असावा, हीच आमची धारणा आहे.”
श्री. बागणे यांनी यशस्वी जीवनासाठी आई-वडिलांच्या स्वप्नांना प्राधान्य देत, जिद्द आणि मेहनतीने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शरद पॅटर्नचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि आपल्या सर्वस्वाने शिक्षण व विकासाकडे वाटचाल करावी. असे सांगितले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी यांनी महाविद्यालयाची माहिती व इतिहास सांगून विद्यार्थ्यांना कृषी पदवी व करिअरच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा. संजय फलके व शैक्षणिक व्यवस्थापक प्रा. संतोष चव्हाण यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सर्व विषयांची तसेच शैक्षणिक नियम यांची सविस्तर माहिती करून दिली.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.स्वागत प्रा. पूजा भोसले यांनी केले. आभार समुपदेशक डॉ. नम्रता पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.