जवाहर साखर कारखान्यास सर्वाधिक साखर निर्यात व सर्वोच्च ऊस गाळप पुरस्कार जाहीर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.23 ऑक्टोबर : सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि., नवी दिल्ली या देश-विदेशातील साखर उद्योगाकरीता सल्ला, संशोधन व मार्गदर्शन करणार्या शिखर संस्थेने हंगाम 2019-20 या वर्षी साखरेची विक्रमी निर्यात केल्याबद्दल तसेच गाळप हंगाम 2020-21 मध्ये सर्वाधिक ऊस गाळप केल्याबद्दल ’सर्वोच्च ऊस गाळप’ हे दोन पुरस्कार जाहीर केले आहेत. सन 2019-20 या 27 व्या ऊस गाळप हंगामात देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांमध्ये देशातून सर्वाधिक म्हणजे 70 हजार 728 मे. टन साखर निर्यात केल्याबद्दल ’प्रथम क्रमांकाचा पुरस्कार’ जाहीर झाला आहे तसेच कारखान्याने मागील सन 2020-21 या 28 व्या ऊस गाळप हंगामात उच्च साखर उतारा विभागामध्ये सर्वोच्च म्हणजे 18 लाख 88 हजार 129 टन ऊसाचे गाळप केले आहे. मागील हंगाम दि. 30 ऑक्टोबर, 2020 पासून 10 एप्रिल, 2021 अखेर 163 दिवस चालला. सरासरी साखर उतारा 12.15 टक्के मिळाल्याने 22 लाख 94 हजार 900 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. जवाहर कारखान्यास जाहीर झालेल्या या दोन्ही पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण सोहळा येत्या 16 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या शेतकर्यांच्या आणि सभासदांच्या विश्वासावर कारखान्याने मागील 28 हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या 28 वर्षात कारखान्यास ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास योजनेची कार्यवाही, साखर निर्यात पर्यावरण संतुलन, वीज बचत, आर्थिक व्यवस्थापन, वृक्ष लागवड अशा विविध विषयातील राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कारखान्यावर सभासद शेतकर्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे. त्यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी, ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी या सर्वांचे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी अभिनंदन केले आहे.
जवाहर साखर कारखान्याने शेतकर्यांसाठी आणि कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या पुरस्कारामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.