कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
रत्नागिरी : संजय पाटोळे
दि.१४ : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जि. प. आदर्श शाळा, शेबवणे–म्हादेवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कडवई प्रभागातील एकूण ४५ जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी विविध मैदानी व सांघिक खेळांतून आपली क्रीडाकौशल्ये, चिकाटी व उत्साह दाखवून दिला.या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कडवई प्रभागाचे विस्तार अधिकारी श्री. आण्णासाहेब बळवंतराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी उपाध्यक्ष श्री. संतोष थेराडे व पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री. विजय परीट उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धांना औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. उदय गावडे सर, गट शिक्षण अधिकारी श्री. विजय परीट व श्री. संतोष थेराडे यांनी विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व पटवून दिले. केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे तर शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शेबवणे–म्हादेवाडी व बौद्धवाडी गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबई मंडळाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास शेबवणे गावचे सरपंच श्री. प्रभाकर तांबे, गावकर श्री. दिलीप म्हादे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बडद, शेनवडे गावचे सरपंच श्री. दत्ता लाखन, माजी सरपंच श्री. शिवराम कानसे, श्री. प्रकाश म्हादे, पत्रकार श्री. सचिन पाटोळे, कडवई प्रभागातील सर्व केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक श्री. दडस सर, श्री. प्रदीप तांबे गुरुजी, श्री. संजय तांबे (निवृत्त अग्निशामक दल प्रमुख), श्री. सुनील तांबे (निवृत्त पोलीस उपनिरीक्षक), श्री. प्रदीप म्हादे (मुंबई मंडळ अध्यक्ष), उपसरपंच श्री. संदेश बने यांच्यासह विद्यार्थी, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धांसाठी शेबवणे–म्हादेवाडी व बौद्धवाडी येथील सर्व ग्रामस्थ व महिला मंडळांनी आर्थिक सहकार्य केले. सर्व स्पर्धा नियोजित वेळेत, सुरक्षित व आनंददायी वातावरणात पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन दंडवते सर यांनी केले, तर क्रीडाज्योतीचे संचलन श्री. शांताराम कदम सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पंच, खेळाडू, शिक्षकवृंद व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार श्री. साईनाथ क्षीरसागर सर यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.