क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा: प्रतिनिधी

दि.३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव (ता. खंडाळा) येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या महान कार्याची आठवण करून देत समाजातील विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा देईल. या स्मारकातून सामाजिक क्रांतीची बीजे रुजतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

       नायगाव येथे आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले स्मारकाचे तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांना अधिकार देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात सर्व प्रकारच्या आवश्यक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अनिष्ट रूढींविरोधात क्रांती केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या मार्गावर शासन कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रूढीवाद, जातिवाद व विषमतेमुळे समाजात सामाजिक व आर्थिक गुलामगिरी निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात ५० लाख महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे नमूद केले. यावर्षी हा आकडा एक कोटीपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात दीड लाख लखपती दीदी झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.