जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मनपा उर्दू शाळा क्र. ५७ ला प्रथम क्रमांक

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१२: राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड मॉडर्न सैनिक शाळा, आळते येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन–२०२६ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा विषय “उदयोन्मुख तंत्रज्ञान (STEM)” असून उपविषय “आपत्ती व्यवस्थापन” असा होता.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण १८४ विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आले होते. यामध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम महानगरपालिका उर्दू शाळा क्र. ५७, इचलकरंजी येथील विद्यार्थिनी आलिया तौफिक तहसीलदार हिने सादर केलेल्या “Life Rescue Machine (जीवन बचाव मशीन)” या उपकरणाने उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे संबंधित शाळेची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
ही निवड इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने विशेष लक्ष देणारे मा. प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांच्या मार्गदर्शनामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास वाढत असल्याचे हे यश स्पष्टपणे दर्शवते. तसेच मा. बी. एम. कासार यांनी दिलेल्या शैक्षणिक मार्गदर्शनामुळे शिक्षक व विद्यार्थी अधिक सक्षमपणे पुढे पाऊल टाकत आहेत.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मा. आयुक्त पल्लवी पाटील या महानगरपालिकेच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सातत्याने मार्गदर्शन करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मनपा शाळांनी विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम महानगरपालिका उर्दू शाळा क्र. ५७ च्या या यशामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या शैक्षणिक कार्याचा दर्जा अधिक अधोरेखित झाला असून, भविष्यातही मनपा शाळांचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.