महापौरांकडून कर्तव्यदक्षतेसोबत माणुसकीचे दर्शन

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि. २२एप्रिल २०२६ :  ( महालक्ष्मी टाइम्स वृत्तसेवा ): शहरात शिस्त प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेकडून मेन रोडवरील अतिक्रमणाविरोधात कठोर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महापौर श्री. उदय धातुंडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान त्यांनी दाखवलेली माणुसकी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.


महापौरांनी यापूर्वीच २१  एप्रिल २०२६ पर्यंत सर्व अतिक्रमणधारकांना फुटपाथ व रस्त्यालगतचे अतिक्रमण स्वखर्चाने काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच हातगाड्या, टपऱ्या, छोटे टेम्पो आदींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ते तात्काळ हटवावेत, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र काही व्यावसायिकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर महापालिकेला कारवाई करावी लागली.
या मोहिमेत महापौरांसोबत आयुक्त, सहआयुक्त, अतिक्रमण निर्मूलन पथक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. मेन रोडवरील अतिक्रमण हटवताना प्रशासनाने अनेक गाड्या व साहित्य जप्त केले.


दरम्यान, केळी विक्री करणाऱ्या एका गरीब व्यावसायिकाची हातगाडीही जप्त करण्यात आली. परंतु, त्याचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी महापौर उदय धातुंडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्या गाडीवरील सर्व केळी खरेदी केली आणि जप्तही केली तसेच संबंधित व्यावसायिकाला सर्व केळ्यांचे पूर्ण पैसे ही दिले. तसेच भविष्यात रस्त्यावर गाडी न लावण्याची समजही दिली.


कर्तव्य बजावताना मानवी संवेदनांचा विचार करणाऱ्या या कृतीमुळे महापौरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठोर प्रशासन आणि माणुसकीचा संगम कसा असावा, याचे उदाहरण या घटनेतून पाहायला मिळाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.