‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

मुंबई: प्रतिनिधी

दि.२७: राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

     सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या  ‘चॅटबॅाट’ लोकार्पण व सामंजस्य करार  पार पडले.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते.

     मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून ही डेमोग्राफिक अॅडव्हांटेज देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर चॅटबॉट’ करणार आहे. एआय आधारित ‘चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चॅटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सेंटर ऑफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा  कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. “महाचतुर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.