ग्रामपंचायत परवान्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; सरपंच व मुलावर गुन्हा

कोल्हापूर: राम आवळे

दि.२७: शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीत व्यवसाय परवाना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सरपंच आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो (ACB), कोल्हापूर यांच्या पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आपल्या पत्नीच्या नावाने “ग्रीन नेट” व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत जैनापूर येथे परवान्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या मंजुरीसाठी सरपंच सौ. संगीता रमेश कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे (वय ३०) यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.तक्रारदाराने या मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागणीची बाब निष्पन्न झाल्याने सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. मात्र संबंधितांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. तरीही लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.दरम्यान, नागरिकांना लाचलुचपत संदर्भात तक्रार असल्यास अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.