कबनूर ग्रामपंचायतचा आर्थिक कारभार ‘लक्ष्मण’च्या मर्जीवर? : नागरिकांचा संताप उफाळला
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि.३०:कबनूर ग्रामपंचायतमधील आर्थिक कारभार सध्या एका लिपिकाच्या ताब्यात असून, गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण व्यवहार ‘लक्ष्मण’ नावाच्या कर्मचाऱ्याच्या भरवशावर चालत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. यामुळे ग्रामपंचायतीतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसुली कर्मचारी दिवसभरात जमा केलेली रक्कम रोज संध्याकाळी संबंधित लिपिकाकडे सुपूर्द करतात. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे पगार, विविध बिले अदा करणे, आर्थिक नोंदी ठेवणे असा सर्व व्यवहार तो एकटाच सांभाळत आहे. मात्र, या प्रक्रियेत नियमांचे पालन होत नसून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, सफाई कर्मचाऱ्यांचे पगार देताना आणि इतर देयके अदा करताना संबंधितांना मुद्दाम “डारदूर” करत असल्याची तक्रार आहे. काही प्रकरणांमध्ये बिले थकवून ठेवणे, देयकांना जाणूनबुजून विलंब करणे, तसेच पैसे बँकेत जमा करताना कमी-जास्त दाखवण्यासारखे गंभीर प्रकार घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, बिलासाठी संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांना प्रतिसाद देणे टाळले जात असल्याचेही समोर आले आहे. पत्रकारांच्या जाहिरातींची बिले अदा करतानाही हेतुपुरस्सर अडथळे निर्माण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या आदेशालाही डावलून स्वतःच्या मर्जीने कारभार चालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “एका कर्मचाऱ्याच्या हाती संपूर्ण आर्थिक सूत्रे देणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रणच,” असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.
दरम्यान, संबंधित लिपिकाच्या उर्मट वर्तनाची आणि अनियमित कारभाराची तातडीने चौकशी करून त्याच्याकडील आर्थिक जबाबदारी काढून घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पारदर्शक आणि नियमबद्ध कारभार सुनिश्चित करावा, अन्यथा या प्रकरणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.