भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि इचलकरंजीचे सुपुत्र डॉ किरण पाटील यांचा महाराष्ट्र शासनामार्फत गौरव
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३०: भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी, बुलढाणा जिल्हयाचे तात्कालीन जिल्हाधिकारी व सध्या आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धविकास पदावर कार्यरत असलेले इचलकरंजीचे सुपुत्र डॉ किरण पाटील यांचा महराष्ट्र शासनाच्या राज्यसेवा हक्क आयोगामार्फत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये बुलढाणा जिल्हयामध्ये राबविलेल्या सहज प्रणाली या नाविण्यपूर्ण उपक्रमाकरिता विशेष मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या संकल्पनेतून सहज प्रणाली आणि महसूल मित्र हे डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे जमिनीचे जुने नकाशे, सातबारा, विविध आदेश आणि आवश्यक कागदपत्रे आता मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत.
महसूल मित्र या व्हाटसअॅप चॅटबॉटमुळे नागरिकांना आवश्यक माहिती आणि शासकीय सेवा अधिक सोप्या पध्दतीने मिळत आहेत. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत असून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान झाले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला तर प्रशासनही लोकाभिमुख होतं, आणि सेवा सुलभ झाल्या की नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो.बुलढाणा जिल्हयात महसूल प्रशासनाने राबवलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या अनेक सुविधा मिळू लागल्या आहेत. या अभिनव उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगानेही दखल घेतली असून डिजिटल प्रशासनाचा हा मॉडेल इतर जिल्हयांसाठीही दिशादर्शक ठरत आहे.
डिजीटल युगात प्रशासन अधिक परिणामकारक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर किती महत्वाचा आहे याचे उत्कृष्ट उदाहरण डॉ किरण पाटील यांनी घालून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय सेवांसाठी कार्यालयीन फेरफटका मारण्याची गरज मोठया प्रमाणात कमी झाली असून घरबसल्या सेवा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. यामुळे केवळ नागरिकांचा विश्वास वाढला नाही तर शासनाच्या कार्यपध्दतीतही सकारात्मक बदल घडून आला आहे. प्रशासन अधिक जबाबदार पारदर्शक आणि जनतेच्या गरजांना प्रतिसाद देणारे बनविण्याच्या दिशेने हे उपक्रम एक महत्वपूर्ण टप्पा ठरत आहेत.अनुभवाच्या जोडीला कामाची शिस्तबद्ध पध्दत, कष्ट करण्याची तयारी, येणा-या आव्हानांना सामारे जाणे. कार्यात हिरीरीने सहभाग घेवून ते पूर्ण करणे या त्यांच्या गुणांमुळे ते एक उत्तम अधिकारी म्हणून सर्वत्र प्रचलित आहेत. नवनविन कल्पनेतून लोकोपयोगी योजना आमलात आणने यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.
डॉ किरण पाटील यांनी या अगोदर बुलढाणा जिल्हाचे जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मंत्रालयातील कृषी, उच्च व तंत्र शिक्षण, मुख्य सचिव महाराष्ट्र सरकार यांचे कार्यालय यामध्ये उपसचिव पदावर काम केलेले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.