डीकेटीईच्या पुढाकारातून महिलांसाठी प्रशिक्षणांसह रोजगाराची संधी

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे प्रतिपादन

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि १ः महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उददेशाने महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिटयूट, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, कल्लाप्पाणा आवाडे टेक्निकल पार्क आणि डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या प्रेरणेतून आणि कल्पनेतून ’महिला विव्हर एअरजेटलूम प्रशिक्षण’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची विस्तृत माहिती देण्याकरीता १ जून रोजी डीकेटीईमध्ये या प्रशिक्षणांसाठी इच्छूक असणा-या महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास सुमारे ४०० हून अधिक महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.


या प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांचे सक्षमीकरण हे केवळ कुटुंबाच्या नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे ही सामाजिक बांधिलकी आहे. डीकेटीईमध्ये राबविण्यात येणारा हा उपक्रम महिलांना आत्मनिर्भर बनविण्यास, त्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्यास आणि अथिर्र्कदृष्टया सक्षम करण्यास मोलाची भूमिका बजावेल. महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेवून स्वतःच्या प्रगतीसह कुंटुंब व समाजाच्या विकासातही सक्रिय योगदान द्यावे. या प्रशिक्षणामध्ये डीकेटीईमध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक रॅपीअर, एअरजेट व इतर सर्व अ‍ॅटोलूम ऑपरेटर यासाठीचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिटयूटचे प्रशिक्षण प्रमुख विकास लोहार यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रमाबददल माहिती दिली तसेच प्रत्यक्ष केएटीपी पार्क तारदाळ येथे प्रशिक्षणार्थी महिलांसोबत भेट दिली. या प्रशिक्षणामध्ये सुरवातीस दि.१३ ते १९ जून  डीकेटीईमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल त्यानंतर २० जून पासून  पुढे महिनाभर प्रात्यक्षिक प्रशिक्षण केएटीपी पार्क तारदाळ येथे होईल.

याआधीही इचलकरंजी शहरात माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रांती गारमेंट योजनेच्या माध्यमातून गारमेंट क्षेत्रात हजारो महिलांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे. गारमेंट उद्योग इचलकरंजीच्या कानाकोप-यात विस्तारला आणि आपल्या शहराला दरडोई उत्पानामध्ये अग्रस्थानी नेण्याचे भाग्य आपल्या कष्टकरी महिलांना लाभले. याच क्रांतीचे पुढचे पाउल म्हणून महिलांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी एक सुवर्णसंधी म्हणून नामांकित डीकेटीई संस्थेमार्फत महिलांसाठी विशेष तांत्रिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे ऑपरेटर, कारागिर, छोटा मालक, मोठा मालक, मोठा उदयोजक असा प्रवास येणार काळात महिलांचाही होणार आहे. या प्रशिक्षणांमध्ये अधिकाअधिक महिलांनी सहभागी होत याचा लाभ करुन घ्यावा व स्वतःचे भविष्य घडवित उदयोगी आणि स्वाभिमानी बनावे.
या कार्यक्रमास डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर संचालक, केएटीपीचे पदाधिकारी, डायरेक्टर प्रा. डॉ एल.एस. आडमुठे, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, नगरसेविका सपना भिसे, रफिक खानापुरे, सतीश कोष्टी, सीमा कमते, अर्चना कुडचे, नजमा शेख यांच्यासह वस्त्रोद्योगातील नामवंत उद्योजक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.